jagrap-sawant-to become relatives
jagrap-sawant-to become relatives 
पिंपरी चिंचवड

आमदार तानाजी सावंत आणि आमदार लक्ष्मण जगताप होणार परस्परांचे व्याही

उत्तम कुटे: सरकारनामा ब्युरो

पिंपरीःसत्ताधारी आमदार पुत्राचे लग्न म्हणजे मोठा सोहळाच. त्यातही सोयरे तसेच तालेवार वा आमदारच असल्यावर विचारणेच नको.पण त्याला फाटा दिला आहे वाकावचे (ता.माढा.जि.सोलापूर) रहिवासी असलेल्या आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी.ते विधानपरिषदेचे शिवसेना सदस्य आहेत.त्यांनी आपला मुलाचे लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यात ठेवले आहे. 

आमदार डॉ.सावंत यांचे सोयरे हे  आणि पिंपरी-चिंचवडमधील मोठी असामी असलेले जगताप कुटुंब आहे.पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सख्ख्या पुतणीशी आमदार डॉ.सावंत यांच्या मुलाचे शुभमंगल होत आहे.

यामुळे राजकारणात तुटलेली शिवसेना,भाजपची युती नातेसंबधात,मात्र झाली आहे.राजकारणात पक्ष असतो,नातेसंबधासाठी तो नसतो, अशी सरळ,स्पष्ट आणि स्वच्छ प्रतिक्रिया या आगळ्या युतीवर आमदार जगताप यांनी दिली.तर, केंद्र व राज्यातील सत्तेत आमची युती आहे.म्हणून ती इथेही केली, अशी मिस्कील टिपण्णी आमदार डॉ.सावंत यांनी दिली.

आमदार जगताप यांचे बांधकाम व्यावसायिक बंधू विजय जगताप यांच्या ज्येष्ठ कन्या चि.सौ.का.राजेश्वरी (बीबीए)हिचे लग्न डॉ.सावंत   यांचे पुत्र गिरीराज (एमबीए) यांच्याशी 18 ला होत आहे.सोनारी (ता.परांडा,जि.उस्मानाबाद) येथील सावंत यांच्या भैरवानाथ शुगर मिल या खासगी साखर कारखान्याच्या मैदानात होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्यात या जोडप्याचेही लग्न लागणार आहे.

कर्ज काढून वा आपल्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या जमिनीचा तुकडा गहाण ठेवून हुंडा देत खर्चिक लग्न करणाऱ्या वधुपित्यांच्या डोळ्यात जगताप व सावंत यां आमदारांनी हे झणझणीत अंजन घातले आहे. काळाची पावले ओळखत त्यांनी सामुदायिक विवाहाचा पायंडा स्वतापासून सुरु केला आहे,हे विशेष.

गेल्या १७ वर्षांपासून आमदार डॉ.सावंत या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करीत आहेत.तो सर्वधर्मीय असतो.त्यात आतापर्यंत साडेतीन हजार विवाह पार पडले आहेत. हुंडा न घेणाऱ्या मुला-मुलींची लग्ने या सोहळ्यात होत आहेत. उलट नवदांपत्याला संसारोपयोगी वस्तू आणि नववधूला सौभाग्यलेणे दिले जाते.

एवढेच नाही,तर गरजू आणि पात्र नववधू आणि वराला डॉ. सावंत उस्मानाबाद आणि सोलापूर येथील आपल्या पाच साखर कारखान्यात योग्य ती नोकरीही देतात.अशा प्रकारच्या  सामुदायिक विवाह सोहळ्यात सावंत यांचे पुतण्या,भाच्या, भाचे अशा कुटुंबातील 18 जणांचीही लग्ने झालेली आहेत.

जयवंतराव सावंत प्रतिष्ठानमार्फत हे सामुदायिक विवाह सोहळे होत आहेत.मात्र,आता त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले जाणार असल्याचे आमदार डॉ.सावंत यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेंतर्गत जयवंतराव सावंत प्रतिष्ठान आयोजित या बॅनरखाली हे सामुदायिक विवाह सोहळे आता होतील, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT