Ajit Pawar Campaign Meeting in Pimpri for Anna Bansode
Ajit Pawar Campaign Meeting in Pimpri for Anna Bansode 
पिंपरी चिंचवड

विरोधक उरले नाही म्हणता, मग मोदी,शहांच्या सभा का घेता? : अजित पवार

सरकारनामा ब्युरो

पिंपरी : विरोधक उरले नाही असे म्हणता, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा का घेता? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला सोमवारी पिंपरी-चिंचवडमध्ये केला. कारखान्याला,नबँकेला मदत करतो, चौकशी थांबवतो, मदत न केल्यास प्लॉटवर आरक्षण टाकतो, असे सांगून विरोधकांना भाजप आपल्याकडे ओढतो आहे. हे थांबविण्यासाठी आघाडीला विजयी करा, असे पवार यावेळी म्हणाले.

भाजप हा बोलघेवड्यांचा पक्ष आहे. परदेशातून काळा पैसा आणू, शेतक-यांची कर्ज माफ करू अशी केवळ घोषणाबाजी भाजपने केली. मात्र, प्रत्यक्षात जीएसटी व नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. लोकांना हे सारे दिसते आहे म्हणूनच भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा हल्लाबोल पवार यांनी यावेळी केला. 

ते म्हणाले, ''ही निवडणूक राज्याची आहे. त्यामुळे 370 चा मुद्दा मांडू नका. राज्यात काय केले ते सांगा. शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतक-यांना 50 हजार कोटी वाटले असे मुख्यमंत्री सांगतात. पण ते खरे असते तर शेतक-यांनी आत्महत्या केल्या असत्या का? मागील पाच वर्षात राज्यात एक तरी नवीन उद्योग आला का? मंत्रीमंडळातील 22 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तरीही मुख्यमंत्री त्यांना क्लिनचिट देतात. मग एकनाथ खडसे, दिलीप कांबळे, प्रकाश मेहता यांना तिकिट का दिले नाही? नोटबंदी व जीएसटीमुळे औद्योगिक मंदीचे सावट आहे मात्र सरकार काही करायला तयार नाही. टेल्को, महिंद्रा, पारले, ऑटोमोबाईल इंडस्ट्रिज, आयटी कंपन्यांची काय अवस्था आहे? विकासदर का घटला? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे.''

''काल चिंचवड येथे पंकजा मुंडेंच्या प्रचार सभेत शास्तीकर, अनधिकृत बांधकामे नियमितीकरण व रिंगरोड रद्द करा यावर विचारणा झाली. त्यावर भाजपने सत्तेचा गैरवापर करून विचारणा करणाऱ्यांनाच अटक केली. हे लोकशाहीत योग्य नव्हे. आमच्या काळातही आंदोलने झाली पण आम्ही सत्तेचा असा माज कधी दाखवला नाही,'' असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT