पिंपरी चिंचवड

पिंपरी पालिकेच्या इतिहासात प्रथमच खासगी स्पीकर सभागृहात

सरकारनामा ब्युरो

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्यावर्षी प्रथमच सत्तेत आलेल्या व बहुमत असलेल्या भाजपचा रेटून कारभार सुरू असल्याचा आरोप यापूर्वीच झाला आहे. पालिका सभागृहात विरोधी सदस्यांना बोलू दिले नाही, तसेच त्यांचा माईक बंद केला जात असल्याच्या तक्रारीची त्यात नव्याने भर पडली. त्यामुळे आजच्या पालिका सभेत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी चक्क माईक असलेला खासगी स्पीकरच सभागृहात आणला.

महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली. मात्र, सभाध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी महापौर नितीन काळजे यांच्या आश्‍वासनानंतर साने हा स्पीकर सभागृहाबाहेर नेला. सभाशास्त्राला धरून नसल्याने खासगी स्पीकर वापराला परवानगी मिळणे अवघड असल्याचे वृत्त नुकतेच (ता.19) "सरकारनामा'ने व्हायरल केले होते. 

दोन दिवसांपूर्वीच हा स्पीकर साने सभागृहात नेणार होते. मात्र, राष्ट्रीय संत भैय्यूमहाराज यांच्या निधनामुळे वीस जूनची ही सभा आजपर्यंत स्थगित करण्यात आली होती. साने यांनी 18 हजाराचा मोठा स्पीकर काही दिवसांपूर्वीच खरेदी केला होता. सभागृहात तो नेण्यासाठी त्यांनी महापौर नितीन काळजे यांना पत्रही दिले होते. मात्र, त्याला त्यांनी परवानगी नाकारली होती. तसेच हा मोठा स्पीकर सभागृहात नेणे शक्‍य नव्हते. त्यामुळे त्यांनी गनिमी कावा केला. 

गळ्यात अडकवायच्या शबनम पिशवीत त्यांनी छोटा माईक असलेला छोटा स्पीकर आज सभागृहात नेला. नंतर, महापौरांकडे त्याचा वापर करण्याची परवानगी मागितली. यापूर्वी विरोधी सदस्यांचा आवाज सभागृहात दाबला जात असल्याचे कारण त्यांनी त्यासाठी पुढे केले. तसेच मंगला कदमांसारख्या माजी महापौर राहिलेल्या ज्येष्ठ नगरसेविकेचा माईक बंद करून त्यांना सभागृहात बोलण्यापासून रोखल्याचा दाखलाही त्यांनी दिला. त्यावर पुन्हा असे होणार नाही, असे आश्‍वासन महापौरांनी दिले. त्यानंतर सुरक्षारक्षकामार्फत हा खासगी स्पीकर साने यांनी बाहेर नेण्यास परवानगी दिली व या स्पीकर नाट्यावर पडदा पडला. 
राजकारणाच्या बित्तंबातम्यांसाठी डाऊनलोड करा sarkarnama अॅप 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT