PCMC BJP
PCMC BJP 
पिंपरी चिंचवड

पिंपरीत भाजप इच्छुकांना पक्षाकडून 'ऐच्छिक' पूरग्रस्त निधी देण्याचे 'आवाहन'

उत्तम कुटे

पिंपरी : पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भाजपने विधानसभा इच्छुकांची मदत घेतली आहे. किमान शंभर व कमाल कितीही रक्कम त्यांना देण्यास सांगण्यात आले आहे. ही मदत ऐच्छिक असल्याचे भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर प्रवक्ते व सरचिटणीस अमोल थोरात यांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीच त्यासाठी पावती पुस्तके दिली असल्याची माहिती त्यांनी दिली. 

भाजपच्या शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील इच्छूकांच्या मुलाखती पक्षाच्या शहर कार्यालयात आज सायंकाळी सहा वाजता होणार आहेत. पक्षाचे शहर निरीक्षक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे सकाळी पुणे जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती दोन टप्यात घेतील. त्यानंतर ते पिंपरी-चिंचवडमध्ये त्यासाठी येणार आहेत. त्याकरिता काल सायंकाळपर्यंत नावनोंदणी करण्यास इच्छुकांना पिंपरी-चिंचवड शहर भाजप कार्यालयातून सांगण्यात आले होते. ती केलेल्यांनी अशी मदत मागितल्याला दुजोरा दिला. त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. फक्त मुलाखतीसाठी ही मदतीची मागणी, तर उमेदवारीसाठी आणखी कुठली व किती मोठी मदत द्यावी लागेल, याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. 

यासंदर्भात थोरात व भाजपचे कार्यालयप्रमुख संजय परळीकर म्हणाले, "किमान शंभर रुपयांपासून हजार रुपयांपर्यंतची ही मदत रोखीने व त्यापुढे चेकने घेतली जाणार आहे. त्याची पावती दिली जाणार आहे. यासाठीची पावतीपुस्तके प्रदेशकडून आली असून चेकही त्यांच्याच नावे घेतले जाणार आहे. नंतर जमा झालेली ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिली जाणार आहे.'' दरम्यान, शहर भाजपकडून पूरग्रस्तांना किमान ५१ लाख रुपये मदतीचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT