पिंपरी चिंचवड

आता शरद पवारच हिंजवडी कोंडीत देणार लक्ष; पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यासह घेणार बैठक

उत्तम कुटे

पिंपरीः सर्वांचीच मोठी डोकेदुखी ठरलेल्या हिंजवडी वाहतूक कोंडीत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीच लक्ष घालायचे ठरविले आहे. ही कोंडी फोडण्यासाठी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व सबंधितांची ते बैठक घेणार आहेत. 

राज्याचे आयटी हब असलेल्या हिंजवडीतील या जटील व गहनप्रश्नी खुद्ध तिच्या शिल्पकारानेच लक्ष घातल्याने त्यावर कायमस्वरुपी दीर्घकालीन तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे.

दररोज सव्वालाख वाहने आणि साडेतीन लाख तंत्रज्ञांची वर्दळ असलेल्या हिंजवडीत सकाळ, संध्याकाळ या गर्दीच्या वेळी काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तास रखडावे लागते आहे. त्यामुळे या जटील प्रश्नाला नव्याने निर्माण झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनीही पहिले प्राधान्य दिले आहे. त्यांचे इतरही अधिकारी त्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यातून त्यांनी `वन वे'चा मार्ग तूर्त काढला आहे. मात्र, ही कोंडी कायमस्वरुपी निकालात काढण्याचे प्रयत्न आता सुरु झाले आहेत. त्यासाठी  प्रथम स्थानिक नगरसेवक शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर दुसरे स्थानिक नगरसेवक राष्ट्रवादीचे राहूल कलाटे हे आता पुढे आले आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात हिंजवडी येते.

राष्ट्रवादीच्या कलाटे यांनी तर हा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी या आयटीनगरीचे शिल्पकार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनाच आता साकडे घातले आहे. त्यांनी काल (ता.7) मुंबईत आपल्या सर्वोच्च नेत्याची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ही समस्या कायमस्वरुपी निकालात काढण्याची त्यांनी विनंती केली. यावेळी सध्या सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती कलाटे यांच्याकडून पवार यांनी घेतली. त्यानंतर पुढील आठवड्यात याप्रश्नी मुख्यमंत्री, खासदार सुप्रिया सुळे, पीएमआरडीए, एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, आयटी पार्कचे प्रतिनिधी व स्थानिक रहिवाशांची बैठक घेऊ, असे पवारसाहेबांनी सांगितल्याची माहिती कलाटे यांनी सरकारनामाला आज दिली. खुद्द साहेबांनीच यात आता लक्ष दिल्याने हा प्रश्न नक्की मार्गी लागेल, असे ते म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT