पिंपरी चिंचवड

दोन खासदारांकडून दोन रेल्वेमार्ग मार्गी

उत्तम कुटे

पिंपरी : बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित पुणे-लोणावळा रेल्वेमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचेसर्वेक्षण चार महिन्यात पूर्ण होऊन पुढीलवर्षी प्रत्यक्ष काम सुरु होईल, अशी माहिती मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज दिली. त्यामुळे लोकलची संख्या दुप्पट होऊन पुणे, पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्यातील रेल्वेप्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. खासदार झाल्यापासून बारणे यांचा गेल्या तीन वर्षापासून यासाठी पाठपुरावा सुरु होता.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्रकुमार शर्मा व पुणे विभागीय क्षेत्र व्यवस्थापक दादाभाय यांच्या उपस्थितीत पुणे येथे नुकत्याच (ता.22) झालेल्या रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नाबाबतच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याच बैठकीत शिवसेनेचे जिल्ह्यातील दुसरे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (शिरूर) यांनीही पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचा एक तप प्रलंबित राहिलेला प्रश्न मार्गी लावला. पुणे जिल्ह्याची उत्तर व दक्षिण अशी दोन्ही टोके जोडणाऱ्या व दळणवळण जलद करणाऱ्या या प्रकल्पाला तीन हजार कोटी रुपये खर्च येणार  आहे. तर, पुणे-लोणावळा या रेल्वेमार्गाचे ट्रॅक दुप्पट करण्यासाठी (दोनाचे चार) नऊशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आढळराव व बारणे यांच्या मतदारसंघात पिंपरी-चिंचवडमधील अनुक्रमे दोन व एक विधासनभा मतदारसंघ मोडतात. लोकलमधील वाढत्या छेडछाड़ीच्या घटना रोखण्यासाठी पुणे-लोणावळा मार्गावरील लोकलमध्ये सीसीटीव्हीही बसविण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. त्यासाठी बारणे यांनी आपल्या खासदार फंडातून खर्च करणार आहेत.

यासंदर्भात बारणे म्हणाले, रेल्वेमार्ग विस्तार खर्च हा केंद्र व राज्य या मिळून करणार आहेत.आपल्या मागणीनुसार लोणावळा स्टेशनवर दोन एस्केलेटर (सरकते जिने) बसवण्यात येणार आहेत. त्यातील एक पुढील महिन्यातच बसविला जाईल. लोणावळ्यातच ओव्हरब्रिज आणि भुमिगत रस्ता, तळेगावमध्ये आणि वडगाव येथील सबवेलाही मंजुरी मिळाली आहे. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, कान्हेफाटा, वडगाव, घोटावडी, कासारवाडी या रेल्वे स्थानकांवर सुविधा देणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT