PCMC New Name Demand: पिंपरी-चिंचवड शहराला अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असं जागतीक दर्जाचे शहर बनवण्यात दिवंगत अजित पवार यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या राजकीय ध्येयधोरणांमुळं या शहराला लौकीक प्राप्त झाला आहे, त्यामुळं या शहराचं नामांतर करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. जालन्यातील मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पहिल्यांदा ही मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवड शहराचं नामांतर अजितनगर करा असा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे.
मराठा मोर्चाचे समन्वयक अरविंद देशमुख म्हणाले, "पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहराला जागतिक स्तरावर ऑटोमोबाईल हब आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख मिळवून देण्यात दिवंगत मुख्यमंत्री यांचा सिंहाचा वाटा आहे.
त्यांच्या या योगदाचा यथोचित गौरव करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराचं नामांतर अजितनगर करण्यात यावं. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी (२ फेब्रुवारी) निवेदन पाठवण्यात आलं आहे. या निवदेनावर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अरविंद देशमुख, अशोक पडूळ, संतोष कऱ्हाळे, अॅड. शैलेश देशमुख, सुभाष चव्हाण, मंगेश मोरे, श्रीकृष्ण यादव, गणेश तराशे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात अजित पवार यांचं अतुलनीय योगदान आहे. गेल्या ३०-३५ वर्षांपासून त्यांनी या औद्योगिक नगरीला नियोजनबद्ध 'आधुनिक पिंपरी-चिंचवड' म्हणून घडवलं, ज्यामुळं शहराला 'बेस्ट सिटी' म्हणून ओळख मिळाली.
अनेक माध्यमं आणि नेत्यांनी त्यांना शहराचा शिल्पकार असंही म्हटलं आहे. अजित पवारांच्या दूरदृष्टीतून शहरात प्रशस्त रस्ते, फ्लायओव्हर, उन्नत मार्ग, पादचारी मार्ग, रिंग रोड आणि नियोजित रस्ते नेटवर्क, यामुळं शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारली आहे.
या शहराला अजित पवारांनी युपीए सरकारच्या जेएनएनयूआरएम अंतर्गत सुमारे २,६०० कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. यातून रस्ते, बस व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था आणि झोपडपट्टी पुनर्वसन यासारखी मोठी कामे झाली.
या औद्योगिक नगरित ४००० हू अधिक लघु उद्योग आणि ३००० हून अधिक कारखाने वाढले. ऑटोमोबाईल हब म्हणून शहराला खास ओळख मिळाली. प्रदर्शन केंद्र, हिरवीगार जागा, स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे आणि ई-गव्हर्नन्ससारख्या सुविधा शहरात निर्माण झाल्या.
१९९२ ते २०१७ पर्यंत या शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळं अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेनं कुठल्याही स्वरुपाचं कर्ज घेतल्याशिवाय विकास केला, ही मोठी आदर्श कामगिरी मानली जाते. अजित पवारांनी बारामतीनंतर पिंपरी-चिंचवडला विकासाचे मॉडेल बनवले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे शहर औद्योगिक आणि राहण्यायोग्य दोन्ही बाबतीत प्रगत झाले.
दरम्यान, अजित पवार यांचं बारामतीजवळ नुकतंच विमान अपघातात निधन झालं. त्यांच्यासोबत विमानातील इतर चार जणांचाही मृत्यू झाला. त्यामुळं महाराष्ट्रासाठी ही अत्यंत धक्कादायक घटना होती. यामुळं राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली असून आता विविध प्रकारचे राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरु झाले आहेत.
पण अशातही अजित पवारांच्या आठवणीत सर्वच स्तरातील लोक उत्स्फुर्तपणे व्यक्त होताना दिसतो आहे. त्यांच्या चांगल्या राजकीय निर्णयांचा आणि राजकारणातील, प्रशासनातील पकड तसंच कामाचा झपाटा यावरही लोक व्यक्त होत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.