Devendra Phadanavis - Gautam Chabukswar
Devendra Phadanavis - Gautam Chabukswar 
पिंपरी चिंचवड

शिवसेना आमदार चाबूकस्वारांचा सरकारविरुद्ध आंदोलनाचा इशारा

सरकारनामा ब्युरो

पिंपरीः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पिंपरीचे आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार यांच्याही तक्रारीची दखलच घेतलेली नाही. त्यामुळे चाबूकस्वारांना त्याबाबत दुसरे पत्र द्यावे लागले आहे. त्यानंतरही दखल घेतली नाही,तर जाहीर आंदोलन करावे लागेल, असा इशारा चाबूकस्वार यांनी दिला आहे.

दरम्यान, चाबूकस्वार यांची तक्रार ही भाजप सत्तेत असलेल्या पिंपरी पालिकेविरुद्ध आहे. पिंपरी पालिका राबवित असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा चुकीचा डीपीआर तयार करण्यात आल्याने पालिकेला दीडशे कोटी रुपयांचा फटका बसत असल्याची चाबूकस्वारांची तक्रार आहे. तर कंत्राटदाराला तेवढा फायदा होणार आहे. बाजारभावाच्या बांधकाम दरापेक्षा दुप्पट दर या योजनेत आकारण्यात आल्याने सर्वसामान्यांना त्याचा फटका बसणार असून कंत्राटदाराचे उखळ पांढऱे होणार आहे. त्यामुळे ही निविदा रद्द करून फेरनिविदेची मागणी चाबूकस्वार यांनी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे केली होती. 

तसेच या योजनेचा हा चुकीचा डीपीआर बनविणारे पालिकेचे सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता प्रदीप तिवारी व प्रकल्प सल्लागार शशांक फडके यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची लेखी मागणीही त्यांनी केली होती. मात्र, त्याची दखलच न घेतल्याने 25 तारखेला त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र त्याबाबत दिले आहे. हा करदात्यांच्या पैशावर अधिकारी व सल्लागारांचा डल्ला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करून प्रकल्प सल्लागाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली आहे. दुसऱ्या पत्राची दखल घेतली नाही ,तर पिंपरी चौकात आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे त्यांनी पिंपरी पालिकेत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT