The Kerala Story:
The Kerala Story: Sarkarnama
पिंपरी चिंचवड

The Kerala Story: ''...म्हणून ‘द केरला स्टोरी’महाराष्ट्रात करमुक्त करा!''; भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chinchwad : ‘द केरल स्टोरी’हा हिंदी चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटावरुन राजकीय संघर्षही चांगलाच पेटला आहे. भाजपशासित मध्यप्रदेश सरकारने हा सिनेमा करमुक्त केला आहे. तर तामिळनाडूतील मल्टीप्लेक्स संघटनांनी चित्रपटगृहात हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता महाराष्ट्र सरकारने देखील हा द केरला स्टोरी हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्रात अधिकाधिक जनतेला 'द केरला स्टोरी' हा चित्रपट पाहता यावा याकरिता तो लवकरात लवकर करमुक्त करावा अशी भावना सर्वसामान्य नागरिकांची आहे.याचमुळे महाराष्ट्रात हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी रविवारी(दि.७) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. हिंदू,ख्रिश्‍चन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना अत्याचाराला बळी पाडणाऱ्या विषयावरील‘द केरल स्टोरी’हा हिंदी चित्रपट सध्या चर्चेत आणि वादात आहे.

देशात ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या हिंदू व ख्रिश्चन मुलींचे वास्तव चित्रण करणाऱ्या ‘द केरला स्टोरी’या सिनेमात हिंदू समाजावरील मुलींवर जिहादी मानसिकता असणाऱ्या लोकांनी अनन्वित अत्याचार करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करून त्यांचे आयुष्य कशा पद्धतीने उध्वस्त केले जाते, याचे योग्य आणि खरे चित्रीकरण केले आहे असा दावा आमदार लांडगे यांनी या पत्रात केला आहे.

निवेदनात काय म्हटलंय?

मागील अनेक वर्षांपासून राज्यातील अनेक ठिकाणी ‘लव्ह जिहाद’च्या घटना समोर येत आहेत. त्याविरोधात राज्यभरामध्ये ठिकठिकाणी हिंदूत्ववादी संघटना,संस्थांनी मोर्चे, आंदोलने केली आहेत. त्यातून राज्यात लव्ह जिहाद कायदा व्हावा यासाठी विधिमंडळ अधिवेशनात हा प्रश्न मांडण्यात आला होता.

...अन् लव्ह जिहादला आळा बसेल!

आपल्या सरकारच्या काळात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल आणि पीडित हिंदू मुलींना न्याय मिळेल अशी अपेक्षा आमदार लांडगे यांनी व्यक्त केली आहे. 'द केरला स्टोरी' (The Kerala Story) या सिनेमामुळे लव्ह जिहादचे वास्तव उजेडात आले असल्याने तो जास्तीत जास्त हिंदूंपर्यंत पोचण्याकरिता त्याला करमुक्त करावे अशी आग्रही मागणी सर्व हिंदू समाज बांधवांच्या वतीने करत आहोत असे आमदार महेश लांडगेंनी निवेदनात म्हटलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT