२६ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान श्रावण महिन्याची सुरुवात होत असल्यामुळे गुरू-शुक्राच्या शुभ योगावर सर्वत्र धार्मिक सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातील. लोकांमध्ये धर्मभावना जागृत होऊन सर्वत्र पूजा, पाठ, अनुष्ठान, यज्ञ, याग यांचे आयोजन करण्यात येईल. कला, सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होईल.
राजकीय क्षेत्रात नेत्यांचे वाक्-युद्ध मोठ्या प्रमाणावर अनुभवास येतील. मोठ्या व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्याविरोधात निदर्शन होतील. राजकीय व्यक्तींवर हल्ले, अपघात किंवा मृत्यूच्या घटना या काळात संभवतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन युती, आघाडीच्या घोषणा होतील. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांकडून मोठा गोंधळ होण्याची शक्यता असून, काही सदस्यांचे निलंबन होईल. अनेक वेळा लोकसभा व राज्यसभा स्थगित करण्यात येईल.अधिवेशनानंतर बिहार निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून, विधानसभा बरखास्त करण्यात येईल. राज्यसभेच्या अनेक सदस्यांची निवृत्ती या अधिवेशनाच्या शेवटी होण्याची शक्यता राहील.
कन्या राशीतील मंगळामुळे या काळात मराठा आरक्षणावरून पुन्हा आंदोलनाची सुरुवात होईल. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून हिंदी-मराठी नेत्यांमधील वाकयुद्ध आणि दोन्ही भाषिकांमधील वाद कायम राहील. जातीय, धार्मिक वादविवादाच्या घटना वाढण्याची शक्यता राहील. शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता राहील. डॉक्टर, नर्स यांचे संप, बंद या काळात अनुभवास येतील.
लहान मुले, विद्यार्थी यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल आहे. शाळा, कॉलेज प्रवेश, अभ्यासक्रम, गणवेश यांवरून मोठा गोंधळ निर्माण होईल. शिक्षकांचे बंद, आंदोलने होतील. काही शाळा, शिक्षकांवर कायदेशीर कारवाया होतील. लहान मुलांमध्ये काही विचित्र आजार पसरण्याची शक्यता असून, विषबाधेच्या घटना अनुभवास येतील.
शनी-मंगळ योगामुळे शेजारील राष्ट्रांत हिंसा/स्फोटक घटना संभवतात. सीमेवर युद्धजन्य स्थिती निर्माण होईल. चीन, पाकिस्तान सीमेवर सैन्यांची जमवाजमव तणाव निर्माण करणारी राहील. चीन, पाकिस्तानकडून सीमेवर आगळीक करण्याचा प्रयत्न होईल. मात्र, दुसऱ्या बाजूला अमेरिकेसारख्या देशांबरोबर महत्त्वाचे व्यापारी करार होतील. शनी- मंगळ योगामुळे काही देशांत थांबलेले युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता राहील.
अमेरिकेच्या टेरिफ टॅक्समुळे अनेक देशांत नाराजी निर्माण होऊन त्याविरोधात व्यापार युद्ध, आंदोलने होतील. २० ते २ ऑगस्ट सूर्य पुण्य नक्षत्रात असून, या नक्षत्रावर पूर्वार्धात मोठी पर्जन्यवृष्टी संभवते. मात्र उत्तरार्धात पावसाचे प्रमाण अल्प राहील. २७ ते ३० जुलै या काळात अनेक ठिकाणी मोठी पर्जन्यवृष्टी संभवते. विशेषतः उत्तर भारतात पूर/अतिवृष्टी, दरड कोसळणे, भूकंप, भूस्खलन अशा दुर्घटना संभवतात. मंगळ-केतू योगामुळे भारतीय खेळाडूंना अर्धवट यश मिळेल. काही स्पर्धा- सामने रद्द होतील. ज्येष्ठ खेळाडू निवृत्ती जाहीर करतील.
सप्ताहात मार्केट अस्थिर राहण्याची शक्यता असून, अनेक वेळा मार्केटमध्ये करेक्शन होऊन पुन्हा तेजी येईल. गुरू-शुक्र योगामुळे सोन्या-चांदीच्या भावातील तेजी कायम राहील. रुपयाचे मूल्य वाढेल. शनी, नेपच्यून योगामुळे या काळात आत्महत्या, अपहरणाच्या घटना वाढतील. नैराश्यग्रस्तांच्या विकारात वाढ होईल. मोठ्या व्यक्तीच्या आत्महत्या किंवा गूढ मृत्यूच्या घटना या काळात संभवतात. ऑगस्टचा पूर्वार्ध लेखक, कलाकारांसाठी प्रतिकूल या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीच्या मृत्यूची घटना संभवते.
मेष : सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमातील चंद्र-केतू युती संततीबाबत चिंता दर्शविते. शेअर मार्केटपासून दूर राहणे योग्य राहील. उत्तरार्धात नोकरीत मोठा बदल संभवतो.
वृषभ : नोकरीत बदली संभवते. घरापासून दूर जावे लागेल. उत्तरार्धात मुलांशी मतभेद संभवतात. विद्यार्थ्यांना सप्ताह कटकटीचा राहील. मित्र-मैत्रिणींशी वादविवाद होतील.
मिथुन : सप्ताहाच्या सुरुवातीला आयोजित प्रवास सहली होतील. भावंडे-नातेवाइकांशी दुरावा वाढेल. महत्त्वाची कामे अर्धवट होतील. मानसिक स्थिती खराब राहील. मुलांकडून सहकार्य मिळेल.
कर्क : स्पष्ट बोलणे टाळावे. पैशाची कामे अर्धवट होतील. मोठे खर्च करावे लागतील. उत्तरार्धात मोठे धाडसी निर्णय घ्याल. कर्तृत्वाची संधी मिळेल. विरोधकांवर विजय मिळेल. परदेशगमन, दूरचे प्रवास होतील.
सिंह : जोडीदाराशी गैरसमज संभवतात. कुटुंबात मोठे कलह संभवतात. बोलताना काळजी घ्यावी. जवळच्या व्यक्ती दुखावल्या जातील. मोठे खर्च उद्भवतील. आर्थिक ओढाताण जाणवेल.
कन्या : कर्जाची कामे अर्धवट होतील. मुलांसाठी खर्च करावे लागतील. मानसिक स्थिती खराब राहील. चिडचिड होईल. वादविवाद टाळावेत. उत्तरार्धात पैशाची कामे होतील. नोकरीत मनासारखे बदल होतील.
तूळ : इच्छापूर्तीमध्ये अडथळे येतील. अचानक मोठे खर्च उद्भवतील. कर्ज मिळविण्यात अडचणी येतील. वादविवाद, कोर्टकचेरीमध्ये नुकसान संभवते. प्रवासात काळजी घ्यावी. चोरांपासून सावध राहावे.
वृश्चिक : राजकीय, सामाजिक क्षेत्रात निवृत्तीचा विचार होईल. व्यवसायात बदल होतील. घरापासून दूर बदली होण्याची शक्यता राहील. उत्तरार्धात मोठे धाडसी निर्णय होतील. कोर्टकचेरी, वादविवादात सरशी होईल.
धनू : धार्मिक विधी, तीर्थयात्रा होतील. मात्र महत्त्वाच्या कार्यात अडथळे येतील. संत, महात्मे, गुरुजनांचे आशीर्वाद लाभतील. उत्तरार्धात वरिष्ठांशी मतभेद संभवतात. नोकरी, व्यवसायात अधिकार वाढेल.
मकर : प्रवास जपून करावेत. वडिलोपार्जित प्रॉपर्टीच्या कामात अडथळे येतील. उत्तरार्धात बदनामीपासून सावध राहावे. विद्यार्थ्यांना नवीन प्रवेश मिळण्यात अडचणी येतील. तरुणांना नवीन नोकरीची संधी मिळेल.
कुंभ : सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराशी दुरावा संभवतो. कोर्टकचेरीचे निर्णय लागतील. मात्र, प्रवासात काळजी घ्यावी. अपघात संभवतात. वारसा हक्कावरून कुटुंबात वादविवाद संभवतात. मोठे खर्च झाल्यामुळे बचत कमी होईल.
मीन : बदली संभवते. हितशत्रूंवर विजय मिळेल. मात्र, आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जोडीदाराशी मोठे मतभेद संभवतात. भागीदारीच्या व्यवसायात कटकटी संभवतात. उत्तरार्धात कमी श्रमातून मोठे लाभ होतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.