मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असून, दोघांची राशी एकच म्हणजे कुंभ आहे. त्यामुळे दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. फडणवीस यांच्याप्रमाणे अजित पवार यांच्या साडेसातीचाही शेवटचा टप्पा चालू आहे. मुख्य पत्रिकेत धनस्थानी केतू असून, बुध-हर्षल युती व शुक्र-मंगळ युतीमुळे अनेक वेळा स्पष्ट बोलण्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला आहे.
सध्या राशीच्या अष्टमातील मंगळाच्या भ्रमणामुळे महिला आयपीएस अधिकाऱ्याबरोबर झालेले संभाषण व्हायरल झाल्यामुळे नमते घ्यावे लागले आहे. मंगळाचे कन्या राशीतील भ्रमण १३ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. तर साडेसाती २०२७ जूनपर्यंत असणार आहे.
या काळात राष्ट्रवादी पक्ष, चिन्हाविषयी न्यायालयीन लढाईची टांगती तलवार असणार आहे. मूळ पत्रिकेत सिंह राशीतील मंगळामुळे कायम सत्तेत राहण्याची संधी मिळाली आहे. तर रवी, हर्षल योगामुळे विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री पदावर काम करण्याची नोंद त्यांच्या नावावर आहे. डिसेंबर २०२५पर्यंत प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून, त्यानंतर मोठे बदल अपेक्षित आहेत.
१३ सप्टेंबर रोजी मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. भारताच्या मकर राशीकडून मंगळाचे भ्रमण दशमस्थातून होणार आहे. याचा परिणाम देशाच्या राजकीय परिस्थितीवर होण्याची शक्यता असून, सत्ताधारी पक्षासाठी हा काळ कटकटीचा राहील. मोठ्या राजकीय व्यक्तीचा मृत्यू या काळात संभवतो.
या मंगळामुळे सीमेवर युद्धजन्य स्थिती अनुभवास येण्याची शक्यता वाटते. शेजारी राष्ट्राकडून कुरापती काढल्या जातील. दहशतवादी आणि माओवादी मारले जातील. शत्रू पक्ष आणि शत्रू राष्ट्रांवर विजय मिळेल. पोलिस, लष्कराला विशेष अधिकार दिले जातील. तुळेच्या मंगळाचे भ्रमण जगातील काही देशांना युद्धाला प्रवृत्त करणारे राहील.
युद्ध, दहशतवादी, कारवाया, स्फोटक घटना, आगीचे अपघात यामधून मोठी हानी संभवते. या काळात मोठे न्यायालयीन निर्णय गाजतील. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष व चिन्हांच्या खटल्यांचे निकाल या काळात लागण्याची शक्यता वाटते. याच काळात सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे.
सूर्याचा शनी बरोबर प्रतियोग होणार आहे. यामुळे सत्ताधारी पक्ष, प्रमुख पदांवरील व्यक्ती, राजकीय व्यक्ती अडचणीत येण्याची शक्यता राहील. निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला अपयशाचा सामना करावा लागेल. केंद्र स्थानातील मंगळामुळे मोठे भूकंप किंवा वादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्तीतून मोठे नुकसान होण्याची शक्यता राहील.
या काळात मंगळ-प्लुटो केंद्रयोग होत असल्यामुळे संप, बंद, निदर्शने, हिंसा, जाळपोळ यांसारख्या घटना होण्याची शक्यता असून, सरकारविरोधात मोठी निदर्शने होतील. दोन समूहांमध्ये तणाव किंवा हिंसा होण्याची शक्यता राहील. ओबीसी-मराठा आरक्षण वाद चिघळण्याची शक्यता राहील. टोळीयुद्ध, गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता राहील. शुक्र सिंह राशीत प्रवेश करीत असून, शुक्र- केतू युती होणार आहे. यामुळे या काळात मोठ्या महिला किंवा कलाकाराच्या मृत्यूच्या घटना होण्याची शक्यता राहील.
देशाच्या उत्तर, ईशान्य भागात पावसाचा जोर कायम राहील. विदर्भ, मराठवाड्यात मोठे पाऊस होतील. शेजारी देशांत मोठी दुर्घटना संभवते. या काळात आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता राहील. विमान, जहाज दुर्घटनांतून मोठी हानी संभवते. शेअर मार्केट या काळात अस्थिर राहण्याची शक्यता असून, मोठे करेक्शन संभवते.
सोन्या-चांदीच्या दरात घट होण्याची शक्यता राहील. रुपयाचे अवमूल्यन होण्याची शक्यता राहील. षष्ठातील गुरूमुळे महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती, मंत्री यांचे आजारपण, तुरुंगवास किंवा कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागेल. षष्ठातील गुरूमुळे धार्मिक विषयावरून बंद, निदर्शने होण्याची शक्यता राहील.
मेष : जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता राहील. भागीदारीत कटकटी संभवतात. मात्र, सप्ताहात होणारी चंद्र-गुरू युती आनंदाची बातमी देणारी आहे.
वृषभ : मंगळ षष्ठस्थानी आल्यामुळे हितशत्रूंवर विजय मिळवाल. नोकरीत बदल करण्यासाठी अनुकूल काळ.
मिथुन : मुलांशी मतभेद संभवतात. शेअर्ससारख्या व्यवसायात नुकसान संभवते. धार्मिक कार्याची, नवीन शिक्षणाची आवड निर्माण होईल.
कर्क : घर-जागेवरून कटकटी संभवतात. घरापासून दूर बदलीची शक्यता राहील. व्हिसा-पासपोर्टची कामे होतील.
सिंह : मोठे कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळेल. उत्तरार्धात होणारी चंद्र-शुक्र युती उत्साह वाढविणारी आहे.
कन्या : कुटुंबात मोठे वादविवाद होण्याची शक्यता असून, स्पष्टवक्तेपणा टाळावा. सप्ताहात होणारी चंद्र-गुरू युती नोकरी व्यवसायामध्ये मोठे बदल करणारी.
तूळ : जोडीदाराशी खटके उडतील व डोके गरम राहील. सप्ताहातील चंद्र-गुरू युती अभ्यासात यश देणारी राहील.
वृश्चिक : आर्थिक ताण सहन करावा लागेल. वादविवादाचे प्रसंग संभवतात. वडिलोपार्जित-वारसा हक्काची कामे होतील.
धनू : मित्र-सहकाऱ्यांशी मतभेद संभवतात. चंद्र-गुरू युती विवाह इच्छुकांचे विवाह जमविणारी राहील.
मकर : सप्ताहात होणारी चंद्र-गुरू युती नोकरीमध्ये चांगला बदल करणारी असून, हाताखालच्या लोकांचे सहकार्य मिळेल.
कुंभ : गुरुजनांशी विसंवाद टाळावेत. विद्यार्थ्यांना अभ्यास-परीक्षेत श्रम पडतील. उपासनेत खंड पडेल. .
मीन : आरोग्याची तक्रार वाढेल. नुकसान सहन करावे लागतील. घर-वाहन खरेदीसाठी उत्तम काळ आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.