दि. १२ मेच्या पौर्णिमान्त कुंडलीमध्ये धनुलग्न उदित असून, तूळ राशीत विशाखा नक्षत्रात पौर्णिमा होत आहे. सप्ताहात रवी-हर्षल युती होत आहे. यामुळे भारत-पाकिस्तान तणाव या आठवड्यात अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, या काळात क्षेपणास्त्रांचा वापर होण्याची शक्यता वाटते.
पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय संरक्षण दलांकडून मोठे हल्ले होतील. पुन्हा एखादा मोठा एअर स्ट्राइक होण्याची शक्यता वाटते. या जोडीला अष्टम स्थानी मंगळ असल्यामुळे मोठे दहशतवादी ठार मारले जातील. मात्र, त्याचबरोबर लष्कर व अन्य सुरक्षा दलांवरही हल्ले होण्याची शक्यता राहील.
जवानांचे अपघात, घातपात होण्याची शक्यता वाटते. सीमेवरील तणाव कायम राहणार असून, सीमेलगतच्या गावांना, स्थानिकांना स्थलांतरित केले जाईल. सीमेलगतच्या गावांवर हल्ले होतील.
पाकिस्तानसाठी सध्याचा काळ प्रतिकूल असून, त्यांची आर्थिक स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता राहील. भारताच्या रणनीतीमुळे पाकिस्तानची चारही बाजूने कोंडी होऊन पाकिस्तानचे पाय आणखी खोलात जातील. मध्यस्थीसाठी पाकिस्तानकडून अमेरिकेला मदत करण्याची विनवणी करण्यात येईल.
पुढील काळात शनी-मंगळ षडाष्टक होणार असल्यामुळे हवेतील युद्ध, एअर स्ट्राइक याबरोबरच विमान अपघात, जहाज दुर्घटना यांमधून मोठी हानी संभवते. ईशान्य भारतात मोठी हिंसा, जाळपोळ यांसारख्या घटना संभवतात.
रवी-हर्षल युतीमुळे आधुनिक शस्त्रास्त्रे व क्षेपणास्त्रांची खरेदी होऊन युद्ध झाल्यास आधुनिक शस्त्रास्त्रांचा किंवा क्षेपणास्त्रांचा वापर होईल. प्रमुख व्यक्तींवर हल्ले होतील. जातीय, वांशिक दंगली पेटविण्याचे प्रयत्न होतील. मात्र, भारताकडून शत्रू देशांना चोख उत्तर दिले जाईल. या काळात मोठ्या अफवा पसरविल्या जातील.
सायबर क्राईम वाढण्याची शक्यता राहील. धार्मिक स्थळांवर हल्ले करण्याचे प्रयत्न होतील. चुकीच्या बातम्या पसरवल्या जातील. त्यातून दोन समाजांमध्ये तेढ पसरविण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. भारतासह युरोपीय देशांमध्येही युद्ध, दहशतवादी कारवाया या घटना घडू शकतात.
युद्ध, भूकंप, अतिवृष्टी यांतून मोठी जीवितहानी संभवते. युद्धजन्य स्थितीचा शेअर बाजारावर विपरीत परिणाम होऊन मोठी घसरण होईल. यातून बँका, वित्तीय संस्था अडचणीत येतील. बँका, सराफी दुकानांवर दरोडे पडण्याची शक्यता राहील.
चतुर्थातील राहू, नेपच्यून, शनी ग्रहांमुळे या काळात हवामान ढगाळ राहील. मध्य भारत, महाराष्ट्रातील उत्तरेकडील प्रदेश, विदर्भ, मराठवाडा या भागात मोठा पाऊस, अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील. शुक्र उच्च राशीत असल्याने सोन्या-चांदीच्या भावातील वाढ कायम राहील.
पुढील काळात गुरू मिथुन राशीत प्रवेश करीत आहे. यामुळे लेखक, साहित्यिकांचा गौरव होईल. अन्य देशांबरोबर मोठे करार होतील. महत्त्वाची विधेयके मंजूर होतील. घटना किंवा कायद्यामध्ये मोठे बदल होतील. वक्फसारख्या कायद्यांमध्ये दुरूस्ती होऊ शकते. या काळात डॉक्टर, बँक कर्मचारी यांचे संप होतील.
मे महिन्यात राजकीय व्यक्ती, सामाजिक किंवा धार्मिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना अनुभवास येतील. धार्मिक स्थळे, धार्मिक कार्यक्रमांमध्ये गोंधळ, चेंगराचेंगरी, अपघात, घातपात, आगीच्या दुर्घटना होण्याची शक्यता राहील. सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षांमध्ये रुसवे-फुगवे अनुभवास येतील. मे महिन्यामध्ये राजकीय, धार्मिक किंवा सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना घडू शकतात.
मेष : सप्ताहात होणारी पौर्णिमा जोडीदाराशी मतभेद वाढविणारी राहील. भागीदारीमध्ये वितुष्ट निर्माण होईल. मात्र छोटे प्रवास फायदेशीर ठरतील. मंगळ कार्य, धार्मिक विधी होतील.
वृषभ : षष्टातील पौर्णिमा आरोग्याची तक्रार राहील. हितशत्रूंचा उपद्रव सहन करावा लागेल. मात्र, कर्जाची कामे होतील. मोठी गुंतवणूक होईल. मित्र, नातेवाइकांशी समज-गैरसमज होतील.
मिथुन : पंचमातील पौर्णिमा मुलांसाठी खर्च करणारी राहील. प्रेमप्रकरणात दुरावा संभवतो. कुटुंबात कलह संभवतो. स्पष्टवक्तेपणामुळे वाद संभवतात. देवधर्म, अध्यात्म यांची आवड वाढेल.
कर्क : चतुर्थातील पौर्णिमा घर, वाहन, जागा खरेदी विक्रीसाठी अनुकूल राहील. कर्जाची कामे होतील. तीर्थयात्रा, परदेशगमन होईल. मंगलकार्य, धार्मिक विधी यांसाठी मोठे खर्च होतील.
सिंह : तृतीय स्थानातील पौर्णिमा भावंडे, नातेवाइकांमध्ये दुरावा निर्माण करणारी राहील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. घर, प्रॉपर्टी विक्रीची कामे होतील. चोरीमुळे नुकसान संभवते.
कन्या : धन स्थानातील पौर्णिमा मोठे खर्च, आर्थिक नुकसान करणारी राहील. भागीदारीमध्ये गोंधळाचे वातावरण राहील. शत्रूवर विजय मिळेल. धाडसी निर्णय यशस्वी होतील.
तूळ : राशीतील पौर्णिमा आरोग्यासाठी प्रतिकूल राहील. विद्यार्थी वर्गाला मोठे यश मिळेल. प्रसिद्धी, पुरस्कार, नावलौकीक मिळेल. भाग्योदयकारक घटना होतील. जोडीदारासाठी चांगले बदल होतील.
वृश्चिक : व्ययस्थानात होणारी पौर्णिमा आरोग्यासाठी मोठे खर्च वाढविणारी राहील. हितशत्रूंचा उपद्रव वाढण्याची शक्यता राहील. मात्र, नोकरीत मोठे बदल होतील. नवीन नोकरीची संधी मिळेल.
धनू : लाभातील पौर्णिमा लाभ देणारी राहील. भागीदारीच्या व्यवसायाची संधी चालून येईल. वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद संभवतात. व्यवहारावेळी फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्या.
मकर : दशमातील पौर्णिमा नोकरी-व्यवसायात मोठे बदल घडविणारी राहील. भावंडे, नातेवाइकांचा सहवास लाभेल. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता राहील. भागीदारीमध्ये मनस्ताप संभवतो.
कुंभ : भाग्य स्थानातील पौर्णिमा विद्यार्थी वर्गासाठी अनुकूल राहील. परीक्षेत मोठे यश मिळेल. संततीविषयी आनंददायक घटना होतील.
मीन : अष्टमातील पौर्णिमा वडिलोपार्जित प्रॉपर्टीची कामे मार्गी लावणारी आहे. घराचे नूतनीकरण, पुनर्विकासासाठी अनुकूल काळ राहील. पाहुण्यांची वर्दळ वाढेल. घरातील वातावरण आनंदी राहील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.