Ashok Bhadrige Sarkarnama
प्रशासन

Bombay High Court driver lawyer : मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींचा ड्रायव्हर आता 'मायलॉर्ड' म्हणणार; कधीकाळी सरन्यायाधीश गवईंचंही केलेले सारथ्य

Driver of Chief Justice Bhushan Gavai Earns Law Degree : मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीचे चालक म्हणून काम करणाऱ्या अशोक भद्रिगे यांनी वकिलीची पदवी घेऊन सनद मिळवली आहे.

सरकारनामा ब्युरो

मयूर फडके

Inspirational story Ashok Bhadrige : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते, तर आज आम्ही कुठे असतो नाही सांगता येणार...' हे शब्द आहेत अशोक विलास भद्रिगे यांचे. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीचे चालक म्हणून काम करणाऱ्या भद्रिगे यांनी वकिलीची पदवी घेऊन सनद मिळवली आहे.

असे करणारे भद्रिगे हे उच्च न्यायालयातील ओरिजनल साइडचे पहिले चालक बनले आहेत. आपल्या या कामगिरीचे श्रेय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देतात. शिवाय उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या सान्निध्यात राहिल्यावर त्यांच्या सहवासातून मिळालेल्या प्रेरणेतूनच आपण एक चालक ते वकील हा प्रवास करू शकलो, असेही भद्रिगे यांनी सांगितले.

भद्रिगे मूळचे पुण्यामधील जुन्नर इथल्या आळेफाट्याचे आहेत. मुंबईत (Mumbai) वास्तव्याला असल्याने त्यांचे भायखळ्याच्या डायमंड ज्युबिली हायस्कूलमध्ये शिक्षण झाले. सुरुवातीच्या काळात घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे 2009 मध्ये पदवी मिळवल्यानंतर घरचा भार सांभाळायचा हेच प्रथम कर्तव्य मानून ते कामाला लागले. वकील होण्याचे कोणतेही ध्येय नव्हते. 2006 ते 2009 अशोक भद्रिगे हा काळ खूप परीक्षा पाहणारा होता. याच काळात त्यांची मुंबई उच्च न्यायालयात चालकपदी निवड झाली.

सुरुवातीला राखीव चालक म्हणून वर्षभर काम पाहिल्यानंतर 2010 पूर्णवेळ चालक म्हणून रुजू झाले. न्यायमूर्तीचा (Judge) चालक असल्यामुळे शिस्त, शिष्टाचार आणि कठोर नियम हे ओघाने आलेच. याच काळात अनेक नामवंत आणि ज्येष्ठ न्यायमूर्तीकडे चालक राहिलेल्या भद्रिगे यांची कायद्याच्या जगाशी ओळख झाली. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, न्यायमूर्ती साधना जाधव, न्यायमूर्ती रियाझ छागला, न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्याकडे त्यांनी काम केले. विद्यमान सरन्यायाधीश गवई उच्च न्यायालयात असताना त्यांच्याकडे दीड वर्षे चालक म्हणून त्यांनी काम केले. सध्या ते मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्याकडे कार्यरत आहेत.

या काळात वकिलीचा विचार मनामध्ये घोंगावू लागला. वकील होण्यासाठी पदवी करणे गरजेचे होते. पदवी मिळेपर्यंत 2016 उजाडले. त्यानंतर विधी शाखेचा अभ्यास करण्यासाठी विधी महाविद्यालयात गेल्यावर सीईटीची माहिती मिळाली; परंतु सीईटीसाठी कमीतकमी 40 टक्क्यांची आवश्यकता होती. तेही नसल्यामुळे 2019मध्ये बारावीच्या गुणांच्या बळावर सीईटीसाठी अर्ज भरला.

भद्रिगे म्हणाले, 2016 पासून जुलै 2024 पर्यंत न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्याकडे चालक होतो. न्यायमूर्ती सांबरे आणि रजिस्ट्रार बदर यांनी मला पदवी परीक्षा पूर्ण करण्यास मदत केली. न्यायमूर्ती इक्बाल आणि न्यायमूर्ती रियाझ छागलांमुळे मला चेंबूर कर्नाटकाच्या विधि महाविद्यालयात (सीकेसीएल) 2020मध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर, चार वर्षे अथक प्रयत्नांनी वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झालो आणि आता तात्पुरती सनदही घेतली असून नोव्हेंबरमध्ये बारची परीक्षा देणार असल्याचे भद्रिगे सांगतात.

न्यायमूर्ती गवईंचा प्रभाव

विद्यमान सरन्यायाधीश गवईंचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. त्यांच्याकडून वकील होण्याची खरी प्रेरणा मिळाली. सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर उच्च न्यायालयात त्यांचा सत्कार सोहळा पार पडला. तेव्हा त्यांची भेट घेतली. त्यांना तुमच्याकडे काम करीत असल्याची आठवण करून दिली, त्या वेळी पदवीधर नव्हतो, आज मी कायद्याची पदवी मिळवल्याचे त्यांना सांगितले. हे ऐकताच त्यांनीही माझी पाठ थोपटली, असे भद्रिगे म्हणाले.

'थँक यू बाबासाहेब...'

वकील झाल्याचे कळल्यानंतर घरच्यांनाही खूप आनंद झाला. आई आणि बाबा खूप आनंदी आहेत. बायको, दोन्ही मुली यांनी मला यासाठी खूप साथ दिली. मी आणि माझी बहीण दोघेही एकत्र वकिली करीत होतो. आधी ती वकील झाली, आता मी झालो, असे त्यांनी सांगितल्यावर 'आपल्या या यशोगाथेचे कोणाला श्रेय द्याल?' असे विचारल्यावर भद्रिगे म्हणाले, 'थँक यू बाबासाहेब....' 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT