Revenue Department Recruitment :  Sarkarnama
प्रशासन

Revenue Department Recruitment : मुख्यमंत्री म्हणतात सरकार वेगाने काम करतंय; पण महसूल विभागाच्या तब्बल 31 टक्के जागा रिक्त

सरळसेवा भरती रखडल्यामुळे उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सम्राट कदम

Revenue Department Recruitment : राज्यात लाखोच्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. परीक्षा होऊनही राज्य सरकारकडून पदभरती रखडली आहे. असे असतानाच राज्याच्या महसूल विभागातून (Revenue Department) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याच्या महसूल विभागातील ३१ टक्के पदे रिक्त असून त्यातील ‘क’ संवर्गातील सर्वाधिक पदे रिक्त आहेत. म्हणजेच महसुल विभागातील ३३ हजार ४३४ पदांपैकी १० हजार ४४८ पदे रिक्त आहेत. (Revenue Department Recruitment Latest News Update)

माहिती अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला महसूल विभागाला काही प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांना महसुल विभागाने दिलेल्या उत्तरामध्ये ही माहिती समोर आली आहे. सरळसेवा भरती रखडल्यामुळे उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.राज्य सरकारने तातडीने सर्व रिक्त पदे भरावीत म्हणून उमेदवार आक्रमक झाले आहे. (Revenue Department Latest news)

पुण्यात (Pune) स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्याने याबाबत सकाळ'शी संवाद साधला. ''राज्याच्या महसूल आणि वन विभागातील अ, ब आणि क संवर्गातील सर्वाधिक पदे रिक्त आहे. यामध्ये जवळपास पाच हजाराहून अधिक पदे ही तलाठ्यांची आहेत. पण राज्य सरकार मात्र त्यांच्या भरतीसाठी कोणत्याच हालचाली केलेल्या नाहीत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केलेल्या घोषणेला निदान शासनाने जागावे. ग्रामीण भागातील यंत्रणांवर रिक्त पदांचा सर्वाधिक ताण पडत आहे. नागरिकांनाही विविध सेवांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे राजेश जाधव याने सांगितलं.

महसूल विभागातील ३० टक्क्याहून अधिक पदे रिक्त असणे निश्चितच गावगाड्यासाठी योग्य नाही. त्याचबरोबर गेली कित्येक वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा एक प्रकारचा हा अन्यायच आहे. शासनाने कोणताही विलंब न करता तातडीने पदभरती करावी. अन्यथा पुढील महिन्यात यासंबंधी आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊ, असाइशाराच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे यांनी दिला आहे.

महसूल विभागातील महत्त्वाच्या पदांचे विवरण...

संवर्ग ः मंजूर पदसंख्या ः रिक्त पदे

उपजिल्हाधिकारी ः ३०० ः ५६

तहसिलदार ः २०९ ः ८५

अराजपत्रित लघुलेखक ः १६६ ः ९२

मंडळ अधिकारी ः ५७०९ ः ९५४

नायब तहसिलदार ः ६३७ ः २८१

तलाठी ः १५७४४ ः ५०३०

टीसीएस मार्फत तलाठी भरती

याशिवाय माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तलाठी संवर्गाची भरती टीसीएस मार्फत करण्यासाठी प्रक्रिया चालू केल्याचे म्हटले आहे. या माध्यमातून चार हजार ६८१ जागा भरण्यात येणार आहे. पण, ही भरती प्रक्रिया केव्हा होईल, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही.

गटानूसार रिक्त पदांचे विवरण (पदोन्नतीसह) ः

गट ः मंजूर पदसंख्या ः रिक्त पदे

अ ः १५७७ ः १४०

ब ः ३४०१ ः ८८३

क ः ३९४७४ ः ९९५६

ड ः ७७९१ ः २३७५

एकूण ः ५२२४३ ः १३३५४

(३१ नोव्हेंबर २०२२ पर्यंतची आकडेवारी)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT