Traffic Jam on NH53 at Bhandara. Sarkarnama
प्रशासन

Bhandara : प्रशासनाच्या हलगर्जीने ‘ते’ 10 हजार जातात भलत्याच मार्गाने.. हा प्रकार काय?

Traffic Jam : सततच्या ‘जाम’मुळे राष्ट्रीय महामार्गाला सर्वाधिक नापसंती; अधिकारी सुस्त, नेत्यांचे दुर्लक्ष

अभिजीत घोरमारे

National Highway 53 : राष्ट्रीय महामार्गावरील बांधकाम, त्यामुळे सातत्याने दुतर्फा होणारी वाहतूक कोंडी (Traffic Jam), दररोजचे अपघात यामुळे भंडारा शहरातून जाणारा धुळे-कोलकता राष्ट्रीय महामार्ग 53 (जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा) वाहन चालकांच्या सर्वांत नापसंतीचा महामार्ग ठरला आहे.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या सुमारे 10 हजार वाहन चालकांनी प्रवासासाठी दुसरी वाट धरली आहे. गुगल मॅपवरही या महामार्गावर कायम वाहतूक कोंडी असल्याचे संदेश येत असतात. त्यामुळे नकाशाच्या आधार घेत प्रवास करणारे या महामार्गाच्या लांबवरूनच आपली वाहने अन्यत्र वळवित आहेत. प्रशासकीय दुर्लक्ष आणि राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे वाहतूक कोंडीच सहज सुटणारा मुद्दा जटील बनत आहे.

भंडारा शहरातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, जड-अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. वाहनांच्या संख्येचा विचार केला तर या मार्गावरून दररोज तब्बल 10 हजार ते 15 हजार वाहने येणे-जाणे करीत असतात. भंडारा शहरातून प्रवास करताना वाहन चालकांना सातत्याने विस्कळीत झालेल्या वाहतुकीचा त्रास सहन करावा लागतो.

शहराच्या जवळपास येताच वाहन चालकांना कोंडी झाल्याचे दिसते. त्यामुळे वाहन चालकांनी शहराला विळखा घालत नवा बायपास तयार करण्यास सुरुवात केली आहे. नागपूरवरुन गोंदियापर्यंत समृद्धी महामार्गाला राज्य सरकारने परवानगी दिल्याने महामार्ग दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहे. हा मार्ग अरुंद आहे. त्यामुळे भंडारा शहरात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यातून तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने अवजड वाहनांना पर्यायी मार्ग द्यायला हवा होता. परंतु जिल्हा प्रशासनाने कोणताही पुढाकार घेतला नाही. बांधकाम विभागाला या कोंडीचे काही घेणेदेणेच नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भंडाऱ्यात येणे-जाणे करणारी 10 हजार वाहने आता नागपूर-रामटेक-गोंदिया या मार्गाने जात आहेत. धुळे-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर नागपूर-भंडारा-देवरी या मार्गावरून वाहनांची संख्या कमी झाल्याचा फटका आम्हालाही बसत असल्याची माहिती नागपूर जिल्ह्यातील माथनी (मौदा) तर भंडारा जिल्ह्यातील सौंदड (साकोली) येथील टोलनाका चालकांनी दिली. वाहन संख्या कमी झाल्याने दररोज सरासरी 15 ते 20 लाख रुपयांची आवक घटल्याचे त्यांनी सांगितले. या मार्गावरील ढाबे-रेस्टोरेंट यांच्या उत्पन्नातही घट झाली आहे. मात्र प्रशासन सुस्त आहे. अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात कोणतेही उपाय होत नसतील तर किमान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तरी या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT