वित्त विभागाचा काल्पनिक वेतनवाढीबाबत महत्त्वाचा आदेश
शासनाच्या अंतिम निर्णयापर्यंत पुढील कार्यवाही स्थगित
सेवानिवृत्त कर्मचारी आणि शिक्षकांचे लक्ष आता पुढील आदेशाकडे
Maharashtra Pension News: सेवानिवृत्तीच्या अगोदर सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीची सेवा पूर्ण करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ‘काल्पनिक वेतनवाढ’ (Notional Increment) देण्याबाबत वित्त विभागाने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. जोपर्यंत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून या विषयावर अंतिम निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत यासंदर्भात कोणतीही पुढील कार्यवाही केली जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम २००९ मधील नियम १० मधील तरतुदींचा संदर्भ देत सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका क्रमांक १५६६२/२०२५ दाखल केली होती. ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीची सेवा पूर्ण झाल्यामुळे काल्पनिक वेतनवाढ मंजूर करण्यात यावी, असा निर्णय उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिला होता. या निर्णयाच्या विरोधात ग्राम विकास विभागाने उच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका (Review Petition) दाखल केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य पिठासह औरंगाबाद,नागपूर आणि कोल्हापूर खंडपीठांसमोर अशाच स्वरूपाच्या अनेक याचिका सादर झाल्या होत्या. या सर्व याचिकांमध्ये उच्च न्यायालयाने १८ मार्च २०२६ रोजी दिलेल्या आदेशाचे अनुकरण करत निर्णय दिल्याचे समोर आले आहे.
या सर्व न्यायालयीन प्रकरणांमध्ये एकच समान कायदेशीर मुद्दा समाविष्ट असल्यामुळे, वित्त विभागाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्राद्वारे सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना या प्रकरणी पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
या पार्श्वभूमीवर, वित्त विभागाच्या उपसचिव सु. अ. हजारी यांनी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी लेखा व कोषागारे संचालनालयाच्या संचालकांना अधिकृत पत्र पाठवले आहे. शासनाचा (वित्त विभागाचा) अंतिम निर्णय होईपर्यंत या प्रकरणात कोणतीही अमलबजावणी किंवा पुढील पावले उचलू नयेत, अशी सूचना या पत्राद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या काल्पनिक वेतनवाढीचा निर्णय तूर्त स्थगित राहिला असून, सर्वांचे लक्ष शासनाच्या पुढील आदेशाकडे लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.