Selected MPSC clerk typist candidates protest delays in receiving appointment letters, highlighting the struggle of unemployed youth in Maharashtra. Sarkarnama
प्रशासन

MPSC : सरकारच्या इव्हेंटसाठी जॉईनिंग रखडले; MPSC चं अग्निदिव्य पार करूनही हजारोंवर बेरोजगारीचा शिक्का!

MPSC clerk typist appointment delay : 'आम्ही पात्र आहोत, यादीत नाव आलंय, कागदपत्रे पडताळली आहेत. मग नेमकं आमचं नियुक्तिपत्र कोणाच्या टेबलवर अडवलंय? पात्र असूनही घरी बेरोजगार म्हणून बसलोय. सरकारला वेळ नाही; पण आमचं भविष्य दावणीला बांधलंय,' अशी संतप्त भावना एका पात्र विद्यार्थ्यांने व्यक्त केली.

Jagdish Patil

प्रज्वल रामटेके

Pune News, 30 Sep : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) विविध विभागांच्या लिपिक-टंकलेखक (गट-क) या पदांसाठी निवड केलेल्या 7 हजार उमेदवारांना मागील काही महिन्यांपासून नियुक्तिपत्रे दिलेली नाहीत. त्यामुळे भरती प्रक्रिया आणि कागदपत्रे पडताळणी पूर्ण होऊनही शासनाच्या केवळ 'रोजगार मेळाव्या'च्या माध्यमातून नियुक्तिपत्र वाटप करण्याच्या अट्टाहासामुळे या पात्र उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

तर सरकारच्या नियुक्तिपत्र वाटपाच्या ‘इव्हेंट’वर पात्र उमेदवारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका विद्यार्थिनीने आपल्या भावना सकाळशी बोलताना व्यक्त केल्या. ती म्हणाले, 'माझे आई-वडील शेतमजुरी करतात. मला नोकरी लागल्यानंतर आमचे दिवस पालटतील आणि गरिबी दूर होईल अशी त्यांची खूप मोठी अपेक्षा होती. तीन वर्षांपासून रात्रंदिवस मेहनत घेतली.

मात्र, आज निवड होऊनही केवळ सरकार मेळाव्याच्या ‘चमकोगिरीसाठी’ आमचे नियुक्तिपत्र अडवून बसले आहे. हा देखावा कशासाठी? आम्हाला नियुक्ती कधी मिळणार? याची वाट बघून आता संयम सुटला आहे. नोकरी लागूनही बेरोजगार राहण्याची वेळ आमच्यावर आली आहे.'

दरम्यान, 'एमपीएससी'ने जानेवारी 2023 मध्ये लिपिक-टंकलेखक पदांसाठी 7 हजारांपेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यानंतर एप्रिल 2023 मध्ये पूर्वपरीक्षा, डिसेंबर 2023 मध्ये मुख्य परीक्षा आणि मे 2024 मध्ये निकाल जाहीर झाला. जुलै 2024 मध्ये कौशल्य चाचणी आणि अखेर 11 जुलै 2025 मध्ये अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाली.

यानंतर 3 सप्टेंबर 2025 पर्यंत सर्व उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीही पूर्ण झाली. मात्र अद्याप विद्यार्थ्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले नसल्यामुळे पात्र उमेदवार अडचणीत सापडलेत. सामान्य प्रशासन विभागाने जिल्हाधिकारी स्तरावर 'मेळावा' आयोजित करून नियुक्तिपत्र देण्याचे परिपत्रक काढले आहे. तर कृषी व पदुम विभागाने 15 सप्टेंबरला असा 'रोजगार मेळावा' आयोजित केला होता.

मात्र काही कारणास्तव तोही पुढे ढकलण्यात आला. प्रशासकीय दिरंगाईमुळे हे मेळावे वारंवार पुढे ढकलले जात आहेत. केवळ काही जिल्ह्यांत प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. परंतु हजारो उमेदवार अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार केवळ नियुक्तिपत्र वाटपाचा ‘इव्हेंट’ करण्याच्या नादात उमेदवारांच्या आयुष्याशी खेळत असल्याची तीव्र भावना उमेदवारांमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे.

'आम्ही पात्र आहोत, यादीत नाव आलंय, कागदपत्रे पडताळली आहेत. मग नेमकं आमचं नियुक्तिपत्र कोणाच्या टेबलवर अडवलंय? पात्र असूनही घरी बेरोजगार म्हणून बसलोय. सरकारला वेळ नाही; पण आमचं भविष्य दावणीला बांधलंय,' अशी संतप्त भावना एका पात्र विद्यार्थ्यांने व्यक्त केली.

तर आणखी एका विद्यार्थ्याने म्हटलं की, 'अशा परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील गरीब उमेदवारांना मोठा मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. नोकरी लागल्याच्या अपेक्षेने कुटुंबांनी पाहिलेली स्वप्ने धुळीस मिळत आहेत. त्यामुळे आम्ही सरकारने विनंती करतो, की लवकरात लवकर आम्हाला नियुक्तिपत्रे देऊन पात्र उमेदवारांना न्याय द्यावा.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT