Pavitra Portal Teacher Recruitment : पवित्र पोर्टलवरील पात्र १९० उमेदवारांची दुसरी यादी जिल्हा परिषदेला धडकली आहे. आता त्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी होणार असून, सोमवारी (ता. २८) समूपदेशन घेतले जाण्याची शक्यता आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी २०२५ नुसार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची मुलाखतीविना पदभरती घेण्यात येत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने ‘पवित्र पोर्टल’वर ७०१ रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जागेच्या अनुषंगाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ५१० उमेदवारांची पहिली यादी ऑगस्ट महिन्यात शिक्षण विभागात धडकली होती.
त्यानुसार तीन दिवस उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. मंगळवारी (ता. १५) उमेदवारांचे समुपदेशन घेण्यात आले. यातून आतापर्यंत ३७२ उमेदवारांना नियुक्ती आदेश काढण्यात आले आहे. तर उर्वरित उमेदवारांचे लवकरच ऑर्डर काढण्यात येणार आहे. असे असताना आता शासनाने पवित्र पोर्टलमधील दुसऱ्या पात्र उमेदवारांची निवड केली आहे.
या १९० उमेदवारांची यादी जिल्हा परिषद शिक्षण विभागात धडकली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे. तद्नंतर समूपदेशन घेऊन नियुक्ती ऑर्डर दिली जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी कागदपत्रे तपासणीकरिता उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
१३८ उमेदवारांच्या कागदपत्रांची फेरतपासणी
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्यांदा ५१० उमेदवारांची यादी प्राप्त झाली होती. या यादीत प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, इडब्ल्यूएस महिला, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांच्या कागदपत्रांची फेरतपासणी केली जाणार आहे. त्यामुळे तब्बल १३८ उमेदवारांची नियुक्ती रखडली असून, आता संबंधित विभागाकडे त्यांचे कागदपत्रे तपासणीकरिता पाठविण्यात येणार आहे. तो पर्यंत त्या उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
एकशिक्षकी शाळेला प्राधान्य
जिल्हा परिषदेच्या दोन हजारांहून अधिक शाळा आहेत. यात प्रामुख्याने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या चारशेच्या जवळपास शाळा असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तर काही शाळा एक शिक्षकी आहेत. परंतु त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. अशा शाळांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.