Daya Nayak
Daya Nayak Sarkarnama
प्रशासन

दया नायक यांनी 25 लाखांचे सेटलमेंट केले... उच्च न्यायालयात याचिका

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलिस अधिकारी दया नायक (Daya Nayak) यांनी चार वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. (PIL against Daya Nayak in Bombay High Court)

नायक हे आंबोली पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असताना चंदन तस्करीच्या एका प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली होती. या आरोपीची सुटका करण्यासाठी नायक यांनी २५ लाख रुपये मागितले, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. यापैकी १० लाख रुपये देण्यात आले होते, पण उर्वरित १५ लाख रुपये मिळण्यासाठी त्यांनी दबाव आणला, असा दावा याचिकादारांनी केला आहे. मोहम्मद वसीम शेख, मुस्तफा चर्णिया आणि अन्य एकाने ही याचिका केली असून एटीएस आणि एसीबीला प्रतिवादी केले आहे. याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे नायक यांना प्रतिवादी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आणि सुनावणी तहकूब केली.

याचिकादारांनी नायक यांच्यावरील आरोपांबाबत एसीबीकडे तक्रार केली होती आणि सापळाही रचला होता; मात्र याची माहिती त्यांना मिळाली, असाही दावा करण्यात आला आहे. याबाबत एक विशेष समिती नेमून तपास करावा, अशी मागणी याचिकेत केली आहे.

दया नायक मुंबईच्या पोलिस वर्तुळातील नेहमीच चर्चेत असणारे नाव आहे. मुंबई पोलिस दलात 1995 मध्ये दाखल झालेल्या नायक यांनी अनेक गुंडांना चकमकीत ठार मारले. त्यांच्यावर मुंबईतील अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झाले होते. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही कारवाई केली होती. दया नायक यांनी त्यांच्या कर्नाटकातील मूळ गावी शाळा सुरू केली असून त्या शाळेचे उदघाटन बिग बी अमिताभ बच्चन यांनी केले होते. या वेळी एम. एफ. हुसेन, सुनील शेट्टी, अफताब शिवदासानी असे सेलिब्रिटी उपस्थित होते. लालचुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर नायक यांना तुरुंगात जावे लागले होते. तसेच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अपसंपदा कमवण्याचा आरोप झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT