IAS Ravindra Khatale : महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये मराठी विरुद्ध गुजराती हा भाषिक वाद नेहमीच सुरु असतो. पण गुजरात सरकारने प्रशासकीय कामात हा वाद न येऊ देता राज्याची राजधानी गांधीनगरची सूत्र एका मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या हाती दिली आहेत. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील रवींद्र ज्ञानेश्वर खताळे यांची गांधीनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. नुकताच त्यांनी जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला.
गुजरात सरकारने गत आठवड्यात काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात खताळे यांचीही मेहसाना महानगरपालिका आयुक्तपदावरून बदली झाली आहे. खताळे हे 2016 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी गीर-सोमनाथचे जिल्हा विकास अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. याशिवाय 'नगरपालिकांचे प्रादेशिक आयुक्त' या पदावरही त्यांनी अहमदाबादमध्ये काम केले आहे.
कोण आहेत रवींद्र खताळे?
रवींद्र खताळे हे मुळचे जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाटोळे गावचे सुपुत्र आहेत. घरी शेती हाच पारंपारिक व्यवसाय होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणाच्या फार सुविधाही नव्हत्या. त्यामुळे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतच त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मनेगाव येथील मविप्र संस्थेच्या शाळेत माध्यमिक शिक्षण घेतले. नाशिकमधील केटीएचएम कॉलेजमध्ये सायन्समधून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले.
लहानपणापासून हुशार असल्याने शाळा आणि कॉलेजमध्येही खताळे यांनी सातत्याने पहिला क्रमांक राखला. बारावीनंतर त्यांनी पुण्यातील व्हीआयटी कॉलेजमधून बी. ई. मॅकेनिकलचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातच जॉनडिअरमध्ये काही काळ नोकरी केली. मात्र, उच्चाधिकारी होण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते.
अखेर दोन वर्षांनंतर त्यांनी ही नोकरी सोडली आणि यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. काही वर्ष अभ्यास केल्यानंतर त्यांना 2016 मध्ये IAS पदावर यश मिळाले. मागील जवळपास 8 वर्षांपासून ते गुजरात प्रशासनात काम करत आहेत. प्रशासनात धडाकेबाज आणि कार्यक्षम अधिकारी असा त्यांचा नावलौकिक आहे. विद्यार्थ्यांमध्येही प्रेरणादायी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.