TET Exam Scam Sarkarnama
प्रशासन

TET: २००१ पूर्वी नियुक्त शिक्षकांनाही TETची सक्ती; पदोन्नतीचा मार्ग आता परीक्षेतूनच!

TET is mandatory for promotion of teachers : २००१ पूर्वी नियुक्त शिक्षकांनाही पदोन्नतीसाठी TET उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट केले. ५७ शिक्षकांची TETमधून सूट मागणारी याचिका न्यायालयाने फेटाळली.

Sudesh Mitkar

TET is mandatory for promotion of teachers : २००१ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना पदन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट लागू होत नाही, असा दावा करणाऱ्या शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा धक्का दिला आहे. पदोन्नती मिळवायची असल्यास संबंधित शिक्षकांनी TET उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने ५७ शिक्षकांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे जुन्या नियुक्तीच्या शिक्षकांनाही आता पदोन्नतीसाठी TETची परीक्षा द्यावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती आबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. रघुनाथ शंकर झावरे यांच्यासह ५७ शिक्षकांनी पदोन्नतीसाठी TETची अट लागू करण्यास आव्हान दिले होते. २००१ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना TETच्या अटीतून सूट देण्यात यावी, असा त्यांचा प्रमुख दावा होता.

औरंगाबाद खंडपीठाने उलटवला दावा

याचिकाकर्त्यांनी २९ जुलै २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेतला होता. त्या निर्णयाच्या आधारे २००१ पूर्वी नियुक्त शिक्षकांना TETची अट लागू होत नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, या युक्तिवादाला हस्तक्षेप अर्जदार योगेश बारकू बोरसे व इतरांच्यावतीने ॲड. अजिंक्य रेड्डी यांनी, ॲड. विष्णू कंदे यांच्या सहकार्याने जोरदार विरोध केला.

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्णयांकडे खंडपीठाचे लक्ष वेधण्यात आले. विशेष म्हणजे, १५ एप्रिल २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठाने दिलेल्या निर्णयाची माहिती कोल्हापूर खंडपीठासमोरील सुनावणीवेळी निदर्शनास आणून देण्यात आली नव्हती, असे औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा ठरला आधार

'अंजुमन इशात ए तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र शासन' या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत पदोन्नतीसाठी TET आवश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठाने १५ एप्रिल रोजी रिट याचिका क्रमांक ३४६१/२०२६ मध्ये २००१ पूर्वी नियुक्त शिक्षकांनाही पदोन्नतीसाठी TET आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते.

या पूर्वीच्या न्यायालयीन निर्णयांचा विचार करून औरंगाबाद खंडपीठाने ५७ शिक्षकांचा TETमधून सूट मिळविण्याचा दावा फेटाळून लावला. त्यामुळे २००१ पूर्वी नियुक्त झाले असले तरी पदोन्नतीच्या टप्प्यावर TETची अट टाळता येणार नाही, हे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.

शिक्षकांच्या पदोन्नतीवर परिणाम

या निर्णयामुळे २००१ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेत TET उत्तीर्ण असणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या जुन्या नियुक्तीच्या शिक्षकांमध्ये या निर्णयामुळे चर्चेला उधाण आले आहे. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे TETच्या अटीपासून सूट मिळण्याच्या अपेक्षांनाही मोठा धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT