Rupee Co-op Bank | Sarkarnama
पुणे

Rupee Bank News : रुपी बॅंकेच्या ठेवीदारांसाठी खुषखबर!

Rupee Bank News : ठेवी परत करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू...

अनिल सावळे

Rupee Bank News: रुपी सहकारी बॅंकेच्या ठेवीदारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. रुपी सहकारी बॅंकेच्या ७० हजारांहून अधिक ठेवीदारांना ठेव विमा महामंडळाकडून (DICGC) ७०० कोटींच्या ठेवी परत करण्यात आल्या आहेत. तर उर्वरित ८० हजार ठेवीदारांना ठेवी परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या ठेवीदारांना ३०० कोटींच्या ठेवी परत करण्यात येणार आहेत.

रिझर्व्ह बँकेकडून २०१३ मध्ये रुपी बॅंकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध लादण्यात आले. २०१६ मध्ये चौकशीअंती तत्कालीन १५ संचालकांसह एकूण ६९ जणांविरुद्ध गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल झाले. त्यांच्यावर कलम ८८ नुसार एक हजार ४९० कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. त्यानुसार संचालकाच्या जप्त मालमत्तेची विक्री करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बॅंकेचे प्रशासक आणि ठेवीदारांकडून रुपीचे सक्षम बॅंकेत विलीनीकरण करण्याचे प्रयत्न झाले. परंतु अवसायक नेमल्यानंतर रुपी बॅंकेचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे.

ठेव विमा महामंडळाकडून पाच लाख रुपयांच्या आतील ठेवीदारांना रकमा देण्याची प्रक्रिया सुरू झाली. बॅंकेचे सुमारे पाच लाख ठेवीदार असून, त्यापैकी ७० हजार ठेवीदारांना ७०० कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. उर्वरित ८० हजार ठेवीदारांना ठेवी परत करण्याबाबत ‘डीआयसीजीसी’कडून मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार ३०० कोटींच्या ठेवी परत करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

पाच लाखांपेक्षा अधिक ठेव असलेल्या ठेवीदारांची संख्या सुमारे पाच हजार आहे. त्यापैकी साडेतीन हजार ठेवीदारांना प्रत्येकी पाच लाख रुपये परत केले आहेत. उर्वरित दीड हजार ठेवीदारांनी दमडीही घेतलेली नाही. तर, दोनशे, पाचशे रुपये, एक ते १० हजार रुपयांपर्यंतच्या ठेवीदारांची संख्या साडेतीन लाख आहे, अशी माहिती बॅंकेकडून देण्यात आली.

कर्मचाऱ्यांचे भविष्यात नेमके काय होणार?

रुपी बॅंकेत (Rupee Bank) सध्या २१० अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. कर्जदारांकडून रक्कम वसूल करण्यासह ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे काम सुरू आहे. ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याची ही प्रक्रिया सुमारे सहा महिने चालेल. त्यानंतर या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भविष्यात नेमके काय होणार?, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात राज्य सरकार आणि सहकार विभागाला योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे.

ज्या ठेवीदारांनी रक्कम परत मिळण्यासाठी रूपी बँकेकडे अद्याप अर्ज केलेले नाहीत, त्या ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यासाठी ठेव विमा महामंडळाकडून बँकेस पुन्हा सूचना प्राप्त झाल्या आहेत. याबाबत संबंधित ठेवीदारांनी बॅंकेशी संपर्क साधावा, असे आवाहन रुपी बॅंकेचे सरव्यवस्थापक नितीन लोखंडे यांनी केले आहे.

रुपी बॅंकेची स्थिती (ठेवीदार आणि ठेव रक्कम कंसात)

पाच लाखांपर्यंतचे ठेवीदार ४ लाख ८६ हजार ५०८ (७०२ कोटी रुपये)

पाच लाखांवरील ठेवीदार ४ हजार ७३१ ( ६०२ कोटी रुपये)

दहा हजार रुपयांपर्यंतचे ठेवीदार सुमारे ३ लाख २५ हजार

एकूण विमा संरक्षित ठेवी ९४३ कोटी रुपये (त्यापैकी वाटप सुमारे ७०० कोटी)

पाच लाखांवरील ठेवी ३६५ कोटी रुपये (विमा संरक्षण नाही)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT