पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. अवघ्या 4 वर्षांच्या मुलीवर झालेल्या या अमानुष कृत्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील 65 वर्षांचा आरोपी केवळ निर्दयी नाही, तर त्याचा भूतकाळही तितकाच धक्कादायक असल्याचे उघड झाले आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने यापूर्वीही गंभीर गुन्हे केले होते. स्वतःच्या पुतणीवर अत्याचार करण्याबरोबरच 75 वर्षांच्या वृद्ध महिलेवरही त्याने बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणांमध्ये शिक्षा भोगून तो 5 ते 6 वर्षांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता. मात्र, बाहेर आल्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही आणि त्याने पुन्हा एकदा भयानक गुन्हा केला.
घटनेच्या दिवशी पीडित मुलगी सुट्टीसाठी आजीकडे नसरापूर येथे आली होती. दुपारच्या वेळी ती राम मंदिर परिसरात खेळत असताना आरोपीने तिला फूस लावून जवळच्या गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून निर्दयीपणे दगडाने ठेचून तिची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह शेणाखाली लपवण्याचाही प्रयत्न त्याने केला होता.
मुलगी बराच वेळ घरी परतली नाही, तेव्हा कुटुंबीयांनी शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ती आरोपीसोबत जाताना दिसून आली. त्यानंतर ग्रामस्थांनी शोधमोहीम राबवत गोठ्यातून मुलीचा मृतदेह शोधून काढला. ही माहिती समोर येताच संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली.
संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने नागरिकांनी कठोर शिक्षेची मागणी केली आहे. परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून “आरोपीला फाशी द्या” अशी जोरदार मागणी होत आहे. या घटनेमुळे समाजातील सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, अशा विकृत प्रवृत्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.