Ghodganga Sugar Factory Election
Ghodganga Sugar Factory Election Sarkarnama
पुणे

भाजप-राष्ट्रवादीने ताकद लावलेल्या घोडगंगा कारखान्यासाठी ७२ टक्के मतदान; उद्या मतमोजणी

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : शिरूर (Shirur) तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा (Ghodganga) सहकारी साखर कारखान्याच्या (Sugar Factory) संचालक मंडळासाठी आज (ता. ६ नोव्हेंबर) ७१.६६ टक्के मतदान झाले. एक जागा बिनविरोध झाली अूसन एकूण २० जागांसाठी आज मतदान झाले. दरम्यान, उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे उसउत्पादक सभासदांबरोबरच तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. (72 percent Voting for Ghodganga Sugar Factory; Counting tomorrow)

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांची निवडणूक सुरवातीला ३१ जुलै रोजी जाहिर झाली होती. त्यासाठी ११० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तथापि, अतिवृष्टीच्या कारणास्तव राज्य सरकारने ही निवडणूक सप्टेंबर पर्यंत स्थगित केली होती. त्यानंतर, २० ऑक्टोबरला नव्याने निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला. तथापि, जेथून ही निवडणूक स्थगित झाली त्याच टप्प्यावरून पुढील निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला. त्यानूसार माघारीसाठीच्या मुदतीत ६८ जणांनी माघार घेतल्याने ४२ उमेदवार रिंगणात राहिले. माघारीनंतर एक जागा बिनविरोध झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेल व भाजपसह विरोधकांच्या घोडगंगा किसान क्रांती पॅनेल मध्ये उर्वरित वीस जागांसाठी सरळ सामना रंगला मतदानासाठी तालुक्यात ६१ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण १९ हजार ३७५ मतदारांपैकी १३ हजार ८२६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

सहा सर्वसाधारण गटातील १५ जागांसह, महिलांसाठी राखीव दोन आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी, इतर मागासवर्ग प्रतिनिधी व भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधीच्या प्रत्येकी एक अशा मिळून वीस जागांसाठी आज उत्साहात मतदान झाले. सर्वसाधारणच्या सहा गटांपैकी मांडवगण फराटा व वडगाव रासाई येथे विशेष उत्साह जाणवला. न्हावरे, तळेगाव ढमढेरे, शिरूर, इनामगाव या ठिकाणीही मतदान केंद्राबाहेर बऱ्यापैकी गर्दी होती. तथापि, दुपारी उन्हाचा चटका वाढल्यानंतर बहुतेक ठिकाणची गर्दी तुरळक होत गेली. मतदान केंद्र मर्यादीत व दूरवर असल्याने बहुतेक मतदारांनी मतदानाला येण्यासाठी वाहनांचा वापर केला.

कारखान्याचे अध्यक्ष, आमदार ॲड. अशोक पवार यांनी वडगाव रासाई येथील केंद्रावर तर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी मांडवगण फराटा येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल हे शिरूर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या सोबत स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर केंद्रावर सर्वपक्षिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार ॲड. अशोक पवार यांनीही दुपारच्या सुमारास या केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रियेचा व परिस्थितीचा आढावा घेतला. घोडगंगाचे जुने माजी संचालक पांडुरंगअण्णा थोरात हे दिवसभर या केंद्रावरच ठाण मांडून बसले होते. या केंद्रावर दुपारी चारपर्यंत केवळ ५५ टक्के मतदान झाले होते. शेवटच्या तासाभरात मतदारांचा ओघ वाढला. रांजणगाव गणपती येथील केंद्रावर दुपारी एकपर्यंत २६३ पैकी १३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. न्हावरे केंद्रावर सर्वाधिक ९१.६७ टक्के मतदान झाले तर शिक्रापूर केंद्रावर सर्वात कमी ४९.४७ टक्के मतदान झाले. कर्डे, सादलगाव, आलेगाव पागा, न्हावरे येथील मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.

मतदानादरम्यान, अनुचित प्रकार टाळण्यासाठी शिरूर, शिक्रापूर व रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता. वडगाव, मांडवगण येथील तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन विशेष फौजफाटा नेमला होता. शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्यासह शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, शिक्रापूर चे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे हे आपापल्या कार्यक्षेत्रात सातत्याने फिरून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. प्रत्येक मतदान केंद्राजवळ एक सहाय्यक पोलिस निरीक्षक व एका उपनिरीक्षकासह दोन ते पाच पोलिस तैनात केले होते. किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी गवारी यांनी सांगितले.

कारखान्याची मतमोजणी सहा फेऱ्यांद्वारे होणार

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वीस जागांसाठी आज शांततेत मतदान झाल्यानंतर, न्हावरे फाटा (ता. शिरूर) येथील कानिफनाथ गार्डन मंगल कार्यालयात उद्या सकाळी नऊपासून मतमोजणी होणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी सांगितले. तीस टेबलवरून मतमोजणीच्या एकूण सहा फेऱ्या होतील. एका टेबलवर एका केंद्राच्या तीन पेट्या या प्रमाणे १८० पेट्यांची मतमोजणी सुरू होईल. त्यानंतर राखीव जागांची मतमोजणी होईल, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT