Pimpri-Chinchwad Sarkarnama
पुणे

PCMC News : शंभरावर सामाजिक संघटनांचा एल्गार; संभाजी भिडेंवर पिंपरीत गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी

सरकारनामा ब्यूरो

Pimpri-Chinchwad News : वादग्रस्त वक्तव्यांबाबत गुन्हे दाखल होऊनही संभाजी भिडेंना अटक करण्यात पोलीस टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ राज्यात पुरोगामी संघटना मोर्चे काढत आहेत. आज (ता.१०) तो पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयावर निघाला. मात्र, पोलिसांनी तो मध्येच अडवला.

राज्यातील सत्तेत असलेले भाजप (BJP), शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी वगळता कॉंग्रेस, ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी या राजकीय पक्षांसह दहा-बारा सामाजिक सघटनांचे प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) संघर्ष समिती या बॅनरखाली या मोर्च्यात सामील झाले होते. शंभरावर संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. भिडेंविरूद्ध पिंपरीतही गुन्हा दाखल करून त्यांना लगेच अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

काही अंतरावर पोलीस (Police) आयुक्तालयाच्या अगोदरच बॅरिकेड लावून पोलिसांनी तो अडवला. नंतर दहा जणांचे मोर्च्यातील शिष्टमंडळ पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना भेटायला गेले. त्यांनी आपल्या मागणीचे लेखी निवेदन आयुक्तांना दिले. त्याव्दारे त्यांनी येत्या दहा दिवसात भिडेंवर गुन्हा दाखल केला नाही. तर आंदोलन राज्यव्यापी करू, असा इशारा दिला आहे. त्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ आयुक्तांनी मागून घेतला आहे.

या मुदतीत भिडेंवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली नाही, तर त्यासाठी कोर्टात खासगी तक्रार त्यासाठी दाखल करू, असा असे या मोर्च्यात सामील झालेले नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

या मोर्च्याबाबत 'सरकारनामा'ने (ता. ८ जुलै) 'संभाजी भिडेंविरोधात शंभरावर संघटना आक्रमक; पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी मोर्चा' या हेडिंगने बातमी दिली होती. शहरात जमावबंदी आदेश लागू असल्याने पोलीस या मोर्च्याला परवानगी देण्याची शक्यता कमी असल्याचे आणि पोलिसांनी परवानगी दिली नाही. तरी तो काढला जाणार असल्याचे या बातमीत म्हटले होते. ते खरे झाले, पोलिसांनी हेच कारण देत मोर्च्याला परवानगी नाकारली.

तसेच त्याचे आयोजक मानव कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे आदी कार्यकर्त्यांना त्यांनी नोटीस बजावली. ती मिळूनही आणि पोलिसांनी परवानगी नाकारूनही त्यांनी व इतरांनी हा मोर्चा काढलाच. मात्र, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून विनापरवानगी तो काढल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध पोलीस आजच गुन्हा दाखल करण्याची दाट शक्यता आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT