Kapil Patil-sharad butte Patil sarkarnama
पुणे

त्या मेसेजनंतर थेट केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचाच फोन आला आणि म्हणाले, ‘बोला शरदराव...’

अवघ्या ४५ मिनिटांत जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आणि जेमतेम २५-३० मिनिटांत स्थायी समितीची सभा यशस्वी करणारे निर्णयक्षम पीठासन अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मोठे पद आले की हवेत जाणारे अनेकजण पाहिले आहेत. पण, दोन वेळा खासदार आणि केंद्रात मंत्री होऊनदेखील कपिल पाटील यांच्यामध्ये तसूभर बदल झालेला नाही. त्याची अनुभूती दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर आणि आजच्या (ता. ११ नोव्हेंबर) दिल्लीतील बैठकीतही आली, असे पुणे जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले. (After that message, I got a call from Union Minister Kapil Patil : Sharad Butte Patil)

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य असोसिएशनचे पदाधिकारी यांनी आज दिल्ली येथील पंचायत राज मंत्रालयातील कार्यालयात पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून मार्गदर्शन केले. त्याबाबतचा अनुभव बुट्टे पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मांडला आहे.

बुट्टे पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असल्यापासून कपिल पाटील आणि माझी ओळख आहे. मी २००७ मध्ये राष्ट्रवादी पक्षाचा पुणे जिल्हा परिषदेमध्ये सत्तारूढ पक्षनेता होतो. तेव्हापासून आमचा परिचय आहे. आम्ही ठाणे जिल्हा परिषदेला भेट देऊन कपिल पाटील यांनी अध्यक्ष म्हणून केलेले प्रभावशाली काम जवळून पाहिले आहे. अवघ्या ४५ मिनिटांत जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आणि जेमतेम २५-३० मिनिटांत स्थायी समितीची सभा यशस्वी करणारे निर्णयक्षम पीठासन अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. पुढे आम्ही ठाणे आणि पुणे येथे पंचायत राज परिषद आयोजित केल्या. तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आणि (स्व.) आर. आर. पाटील यांच्याकडून काही निर्णय मंजूर करून घेतले. ‘यशदा’मध्ये एकत्र येऊन काही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे सहाजिकच कपिल पाटील आणि आमचे अतिशय सलोख्याचे संबंध आले.

केंद्रात दोन महिन्यांपूर्वी मंत्री झाल्यानंतर मी त्यांना एक संदेश पाठवला होता. राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींसाठी तुम्ही केंद्रीय मंत्री म्हणून काहीतरी करा, अशी त्यात विनंती केली होती. नव्याने मंत्रीपदाचा कारभार स्वीकारला असल्याने कार्यबाहुल्यामुळे त्यावर तातडीने उत्तर येईल, अशी अपेक्षा नव्हती. पण, कपिल पाटील यांचा थेट फोन आला आणि ‘बोला शरदराव...’ म्हणून त्यांनी सुरुवात केली. सुमारे दहा वर्षांपूर्वीपासूनचे आपलेपणाचे प्रेम त्यांच्या बोलण्यात होते, त्यांनी मागील महिन्यात दिल्लीला बोलावले. घरी वेळ देऊन आमच्याशी चर्चा केली आणि आजच्या बैठकीचेही नियोजन केले, असेही बुट्टे यांनी नमूद केले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य असोसिएशनचे आम्ही १५ ते २० पदाधिकारी महाराष्ट्रातून बुधवारी रात्री दिल्लीला गेलो होतो. आम्हा सर्वांना त्यांनी आपल्या बंगल्यावर बोलून स्नेहभोजन दिले आणि तब्बल तीन ते चार तास महाराष्ट्रातल्या पंचायत राज व्यवस्थेबद्दल आणि त्यांच्या जुन्या कारकिर्दीबद्दल दिलखुलास व अभ्यासपूर्ण चर्चा केली. ग्रामपंचायतीचे सरपंच, सभापती आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम प्रभावी होती आणि आज देखील या संस्थांमध्ये असलेल्या बारकाव्यांची त्यांना किती जाण आहे, हे मला माहीत होते. इतर सर्व पदाधिकाऱ्यांसोबत ते आज पुन्हा अनुभवता आले. आज निर्माण भवनमध्ये त्यांनी आमची ग्रुप बैठक घेतली आणि आमच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली. प्रत्येकाशी व्यक्तीगत संवाद साधला, असेही ते म्हणाले.

बैठक संपल्यानंतर आणि कार्यालयातील चर्चा संपल्यानंतर त्यांनी आठवणीने महाराष्ट्राच्या पंधरा-वीस पदाधिकाऱ्यांच्या समक्ष मला त्यांच्या खासगी कक्षात घेऊन गेले आणि माझ्याबद्दल वेगळा विश्वास त्यांनी दाखवला. तसा त्यांचा मी कार्यकर्ता नाही किंवा माझे ते नातेवाईक नाहीत. पण एक अभ्यासू कार्यकर्ताप्रमाणे त्यांनी मला सन्मान दिला, त्याबद्दल त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आज आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून ते अतिशय प्रभावी काम करत आहेत. देशातल्‍या अनेक राज्‍यांत जात योजनांचा आढावा घेत आहेत. अडचणी समजून घेत आहेत आणि अतिशय चांगले निर्णय करत आहेत. आयुष्यात पदे येतात आणि जातात. नेतृत्वामध्ये असलेली माणुसकी, प्रेम आणि आपलेपणा हा मात्र कायम स्मरणात राहतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT