Daund, Ganesh Jagdale Sarkarnama
पुणे

Daund APMC News : भाजपसाठी मतदारांना पैसे वाटणाऱ्या नेत्याच्या गळ्यात सभापतीची माळ

Daund Bazar Samiti : दौंड बाजार समितीच्या सभापतीपदी गणेश जगदाळे यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे

प्रफुल्ल भंडारी

Daund Bazar Samiti News : बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारासाठी चार वर्षापूर्वी मतदारांना पैसे वाटणारे लिंगाळी ग्रामपंचायत सदस्य गणेश जगदाळे यांची दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदावर निवड झाली आहे. भाजप पुरस्कृत पॅनेल मधून निवडून आल्यानंतर गणेश जगदाळे यांची एका मताच्या फरकाने सभापतिपदी निवड झाली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान दौंड शहराला लागून असलेल्या लिंगाळी येथील मतदानकेंद्राबाहेर २३ एप्रिल २०१९ रोजी लिंगाळीचा तत्कालीन उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश जगदाळे यांनी भाजप उमेदवारासाठी मतदारांना पैसे वाटले होते. कांचन राहुल कुल या भाजपच्या (BJP) उमेदवार होत्या व त्यांच्यासाठी एका मताला शंभर रूपये याप्रमाणे जगदाळे पैसे वाटत होते.

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी पैसे वाटण्याचा व्हिडिओ चित्रीकरण निवडणूक प्रशासनाला पाठविला होता. सदर प्रकाराची माहिती मिळताच भरारी पथक तेथे दाखल झाले होते. २४ एप्रिल २०१९ रोजी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तत्कालीन प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या आदेशानुसार भरारी पथकातील अधिकारी भापकर यांनी गणेश जगदाळे याने मतदारांना प्रलोभन दाखविण्यासह पैसे वाटप केल्याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

जगदाळे यांचा पैसे वाटतानाचा व्हिडिओ दौंड (Daund) पोलिसांच्या ताब्यात आहे. मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी जगदाळे यांच्याविरूध्द मतदारांना लाच देऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

२०१६ मध्ये झालेल्या दौंड बाजार समिती निवडणुकीत ग्रामपंचायत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार दत्तात्रेय पाचपुते यांनी राष्ट्रीय समाज पक्ष पुरस्कृत जनसेवा पॅनेलचे उमेदवार जगदाळे यांचा दोन मताने पराभव केला होता. २८ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या बाजार समिती निवडणुकीत भाजप व मित्रपक्ष पुरस्कृत जनसेवा पनेलचे उमेदवार म्हणून जगदाळे यांनी ग्रामपंचायत मतदारसंघात विजय मिळविला.

भाजप आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांचे समर्थक असलेले जगदाळे यांची दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी एका मताच्या फरकाने आज (ता. २५) निवड झाली आहे. त्यांची निवड होताच विरोधकांनी भाजपला कोंडीत पडले आहे. जगदाळे यांचा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाल्यामुळे या प्रकरणावरुन दौंडमध्ये पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT