pcmc  Sarkarnama
पुणे

पालिकेची मुदत संपत आल्याने १८० कोटींचे विषय अवघ्या काही मिनिटांत मंजूर

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची (PCMC) मुदत 13 मार्च 2022 ला संपत आहे. त्यामुळे पालिकेची स्थायी समिती (PCMC Standing Committee) गेल्या काही बैठकांतून कोटीच्या कोटी उड्डाणे भरु लागली आहे. तिच्या नुकत्याच (ता.२८ फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत काही मिनिटांतच एकशे ऐंशी कोटी रुपयांचे प्रस्ताव त्यावर साधकबाजक चर्चा न करता मंजूर करण्यात आले. त्यात ११६ कोटींची विकासकामे आहेत.

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे मंजूर केलेल्या ८५ विषयात तब्बल ५० हे ऐनवेळचे होते. फक्त वीस-पंचवीस मिनिटांत ही ऑनलाईन सभा संपली, असे एका सत्ताधारी भाजपच्या स्थायी सदस्याने 'सरकारनामा'ला सांगितले. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात ही सभा झाली. अॅड. नितीन लांडगे अध्यक्षस्थानी होते. १६ सदस्यीय समितीची ही शेवटची सभा होती. कारण फेब्रुवारीअखेर आठ सदस्यांचा दोन वर्षाचा कालावधी संपला. त्यांच्याजागी १३ दिवसांसाठी नवे सदस्य नियुक्त केले गेले नाहीत. तसेच, मुदत संपलेल्या सदस्यांना १३ दिवसांसाठी मुदतवाढ देण्यात आली नाही. त्यामुळे १३ तारखेपर्यंत होणाऱ्या दोन सभा या फक्त आठ सदस्यीय स्थायी समितीने घेण्याची वेळ प्रथमच आली आहे.

दरम्यान, विनाचर्चा कोट्यवधी रुपयांचे विषय काही मिनिटात घाईघाईने मंजूर करण्याच्या स्थायी समितीच्या कामकाजावर सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक निधी उभा करण्यासाठी आणि कंत्राटदारांचे आर्थिक हित जोपासण्याकरिता स्थायी घाईगडबडीत विकास कामे मंजूर करत आहे, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT