Vidya Chavan - Rupali Thobre Patil
Vidya Chavan - Rupali Thobre Patil  Twitter
पुणे

विद्या चव्हाण यांची वर्णी लागताच रुपाली ठोंबरेंची पहिली प्रतिक्रिया

सरकारनामा ब्युरो

मुंबई : रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अनेक दिवस रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला (Women wing) प्रदेशाध्यक्षपदी आता माजी आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान (Fouzia Khan) यांनी आज ही घोषणा केली आहे. या निवडीनंतर बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या, देशातील महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई प्रचंड वाढत आहे. अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असताना सर्व महिलांना सोबत घेवून यावर आम्ही सातत्याने आवाज उठवणार आहे.

याशिवाय राज्यात पहिल्यांदाच महिला आघाडीच्या विभागवार अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. यात विदर्भातील नागपूर विभागासाठी शाहीन हकीम आणि अमरावती विभागासाठी वर्षा निकम यांची निवड करण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद - शादिया शेख, लातूर - वैशाली मोते यांची वर्णी लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी - कविता म्हेत्रे आणि पुणे विभाग - वैशाली नागवडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्रासाठी अनिता परदेशी यांची नियुक्त करण्यात आळी आहे. कोकण विभागासाठी देखील २ अध्यक्ष असणार आहेत, असे फौजिया खान यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान विद्या चव्हाण यांची नियुक्ती होण्यापूर्वी या पदासाठी मनसेमधून नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या पुण्याच्या फायरब्रँड नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने विद्या चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. यानंतर बोलताना रुपाली पाटील ठोंबरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत विद्या चव्हाण यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी विद्या चव्हाण यांना त्यांच्या अध्यक्षीय कामासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT