Baba Kamble & Ajit Pawar Latest News
Baba Kamble & Ajit Pawar Latest News Sarkarnama
पुणे

सोशल मिडियावरील 'त्या' रिक्षावाला मुख्यमंत्री फोटोची अजितदादांनी केली चौकशी

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : रिक्षाचालक म्हणून आपल्या करिअरची सुरवात करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. दुसरीकडे सोशल मिडियात (Social Media) रिक्षाचालक मुख्यमंत्री म्हणून शिंदेच्या नावाचा मजकूर आणि त्यांच्या चेहऱ्याशी साम्य असलेला २५ वर्षापूर्वीचा जुना फोटो रिक्षासह झळकला. त्याची जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान, हा फोटो बघून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आता विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनाही या फोटोबद्दल उत्सुकता होती. यामुळे हा फोटो खरच मुख्यमंत्री शिंदेंचा की पिंपरीतील महाराष्ट्र रिक्षा पंचायत या रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांचा हे जाणून घेण्यासाठी त्यांनी थेट कांबळे यांना फोन करून माहिती घेतली आहे. यावेळी खुद्द कांबळेंनी या फोटोबद्दल सविस्तर माहिती पवारांना दिली. (Baba Kamble & Ajit Pawar Latest News)

पवार यांनी कांबळे यांना आज फोन करून चौकशी केली. ते म्हणाले, " बाबा, 'तो' फोटो तुझा का?, अशी विचारणा त्यांनी कांबळे यांना केली. यावर कांबळे यांनी त्यांच्या सुरूवातीच्या काळात रिक्षाचालक म्हणून केलेल्या कामाची माहिती दिली. आणि १९९७ साली श्रावण महिन्यात रिक्षा स्टॅंडवर रिक्षाची पुजा केल्यानंतर काढलेला हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याचे सांगितले. तेव्हा अजितदादा हसत म्हणाले की शिंदेचा फोटो असल्याचे सांगितले जात आहे. हा फोटो भुजबळ साहेबांनीही देखील मला पाठवला. यामुळे नक्की काय समजत नव्हते मात्र, नंतर कळाल की हा फोटो आपला आहे. यामुळे फोन केला, असे ते म्हणत त्यांनी कांबळे यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.

ठाण्यातील एमएच-०३ ऐवजी पिंपरीतील एमएच-१४ असा त्या रिक्षाचा नंबर असल्याने संशय बळावला. यामुळे याबाबत काल कांबळे यांच्याकडे चौकशी केल्यावर हा फोटो शिंदेंचा नसल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, या फोटोवर कमेंटचा पाऊस पडला. हा फोटो कांबळेचा आहे, हे माहिती असणाऱ्या पिंपरी-चिंचवड, पुण्यातील रिक्षाचालकांनी आता आमचा बाबा (कांबळे) हा आमदार व किमान नगरसेवक, तरी होणार अशा प्रतिक्रिया दिल्या. तर, हा फोटो शिंदेचा आहे, हे समजलेल्यांनी रिक्षाचालकच मुख्यमंत्री झाले आहेत, यात काही शंका नाही अशा पोस्टही टाकल्या होत्या.

याबाबत सोशल मिडियावर मुख्यमंत्री झाल्याचा आनंद झाला का अशी विचारणा 'सरकारनामा'ने केली असता त्यावर कांबळे मनमोकळेपणे हसले. या पोष्टनंतर असंख्य फोन आल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या व शिंदेंच्या जुन्या फोटोत साम्य असल्याने नेटकऱ्यांचा गैरसमज झाला असावा, असा उलग़डा त्यांनी केला. एका बातमीसाठी मराठी दैनिकाला माझ्या कार्यालयातून हा फोटो देण्यात आला होता. नंतर तो सोशल मिडियात कसा गेला व फिरला हे, मात्र कळले नाही. पण रिक्षाचालकांत त्याची मोठी चर्चा झाली, असे कांबळे यांनी सांगितले.

शिंदे हे राजकारणात येण्यापूर्वी ठाण्यात रिक्षाचालक होते. म्हणून एक रिक्षाचालक आज मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाला असल्याचे सांगणारी रिक्षासह तिच्या चालकाचा (शिंदेचा) फोटो असलेली ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली. नेहमीप्रमाणे व्हाटसअप विद्यापीठात त्याची खात्री न करता भरभरून कमेंट आल्या. मुंबई, ठाण्यातील ग्रुपवरही ती गेली. फेसबुकवरही पसरली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT