Sunil Tatkare, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar video : अजितदादांच्या आवाजातील ‘ते’ Video पाहून तटकरे संतापले; निर्वाणीचा इशारा देत म्हणाले, काही व्यक्ती स्वार्थी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी…

Sunil Tatkare warning, AI voice controversy : अजितदादांबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात अपार आदर, प्रेम आणि विश्वासाची भावना आहे. मात्र त्या भावनेचा गैरफायदा घेऊन जनतेमध्ये आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा घातक प्रयत्न आहे, असे सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. अद्यापही दादा आपल्यात नाहीत यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अनेक कंटेंट क्रियेटर आणि काही नागरिकांकडून दादांच्या आवाजातील एआय व्हिडिओ तयार केले जात आहेत. मात्र आता असे व्हिडिओ तयार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अजित पवार यांच्या आवाजातील एआय व्हिडिओ टाकल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याबाबतचे प्रसिद्धी पत्रक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काढले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या आवाजातील त्यांच्या प्रतिमेचा वापर करून एआय तंत्रज्ञानाद्वारे बनावट चित्रफिती व ध्वनिफिती बनवल्या जात असून त्या समाज माध्यमांवर प्रसारित देखील करण्यात येत आहेत.

या व्हिडिओचा उपयोग काही व्यक्ती स्वार्थी राजकीय व सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी करत असून दादांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारी वक्तव्ये पसरवत आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे, असं तटकरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

दादांबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात अपार आदर, प्रेम आणि विश्वासाची भावना आहे. मात्र त्या भावनेचा गैरफायदा घेऊन जनतेमध्ये आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा घातक प्रयत्न आहे. त्यामुळे अशा प्रकारे दिवंगत नेत्याच्या प्रतिमेचा वापर करणे, हे अत्यंत हीन आणि निषेधार्ह कृत्य असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.

तटकरे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्पष्टपणे हा व्हिडिओ तयार करणाऱ्यांना इशारा देतो, संबंधित व्यक्तींनी अशा एआय-निर्मित बनावट चित्रफिती व ध्वनिफितींचे प्रसारण तात्काळ थांबवावे. अन्यथा संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात करण्यात येणार आहे.

सायबर कायद्यांनुसार आणि अन्य लागू कायद्यांनुसार गुन्हे नोंदवून दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी पक्ष कटिबद्ध आहे. तसेच, जनतेला व सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की, अशा कोणत्याही संशयास्पद ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप्स पुढे पाठवू नयेत, प्रसारित करू नयेत आणि त्यावर विश्वास ठेवू नये. सत्यतेची खात्री न करता कोणतीही माहिती शेअर करणे टाळावे, असे आवाहन तटकरेंनी केले आहे.

दिवंगत अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने असत्य प्रचार करणे हे समाजहिताला बाधक असून लोकशाही मूल्यांना धक्का देणारे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा सर्व कृत्यांचा तीव्र निषेध करीत असून संबंधितांनी तात्काळ हे प्रकार बंद करावेत, अन्यथा कडक कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, याची नोंद घ्यावी, असा इशारा सुनील तटकरे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT