Ajit Pawar-Amol Kolhe
Ajit Pawar-Amol Kolhe Sarkarnama
पुणे

अमोल कोल्हेंच्या स्वप्नातील प्रकल्पांना अजित पवारांकडून बळ!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी (ता. ११ मार्च) विधानसभेत सादर केला. या वेळी त्यांनी तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकारकडून २५० कोटींचा निधी देण्यात येत असल्याची पहिलीच घोषणा केली. तसेच, पुण्याजवळ इंद्रायणी मेडीसिटी उभारणार असल्याचे जाहीर केले. या दोन घोषणा करून अजित पवारांनी राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या स्वप्नातील प्रकल्पांना भक्कम पाठबळ दिले आहे. (Ajit Pawar announces Amol Kolhe's dream projects in the budget)

खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तसेच निकालानंतरही तुळापूर येथे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक करण्याची मागणी केली होती. त्याबाबतचा पाठपुरावाही खासदार कोल्हे यांनी पक्ष आणि सरकारी पातळीवर जोमाने केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात या प्रकल्पाची घोषणा करून कोल्हे यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.

कोरोना काळातील वैद्यकीय स्थिती पाहून खासदार कोल्हे यांनी अत्याधुनिक अशी इंद्रायणी मेडिसिटी उभारण्याबाबत भाष्य केले होते. अनेक कार्यक्रमांत आणि सरकारच्या पातळीवरही त्यांनी अत्यंत तळमळीने त्याची मांडणी केली होती. त्यालाही यश आले असून आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री पवारांनी देशातील पहिली वैद्यकीय वसाहत पुणे शहराजवळ उभारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोल्हे यांचे हेही स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे.

या घोषणेत अजित पवारांनी म्हटले आहे की, देशातील पहिली वैद्यकीय वसाहत पुणे शहराजवळ सुमारे तीनशे एकर जागेत उभारण्यात येईल. या वसाहतीमध्ये रुग्णालये, वैद्यकीय संसोधन, औषधनिर्मिती आणि वेलनेस फिजिओथेरपी केंद्र यांचा समावेश असणार आहे. अत्याधुनिक अशा वैद्यकीय सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान, या दोन्ही घोषणांबद्दल खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडी सरकारचे ट्विट करून आभार मानले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, धन्यवाद अजितदादा. पुणे शहरात एकाच छताखाली सर्व उपचार उपलब्ध करून देणाऱ्या ३०० एकरांवरील इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पासाठीच्या पाठपुराव्याला यश आले. अजितदादांनी अर्थसंकल्पात यावर काम करण्याची इच्छाशक्ती दाखवली आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्णत्वास येवो, हीच अपेक्षा.

अजितदादांनी अर्थसंकल्पात छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू-तुळापुर येथील स्मारकासाठी २५० कोटींची तरतूद करण्याची आणि ‘संभाजी महाराज शौर्य पुरस्कार’ सुरू करण्याची घोषणा केली. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आणि महाविकास आघाडी सरकारचे मनापासून आभार मानतो, असे ट्विट कोल्हे यांनी केले आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT