Ajit Pawar- Raj Thackeray News
Ajit Pawar- Raj Thackeray News Sarkarnama
पुणे

कार्यकर्त्यांची धरपकड होते अन् हे गॅलरीत ये जा करतात; अजितदादांनी राज ठाकरेंची उडवली खिल्ली

सरकारनामा ब्यूरो

पुणे : आम्हाला महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवू द्यायचा नाही. मग कायदा मोडणारा कुठल्या पक्षाचा, कुणाचा समर्थक, सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचा असो हे आम्ही हे बघणार नाही. जो सविधानाने दिलेल्या नियमाचे उल्लंघन करत असेल नियम मोडणार असेल तर आम्ही सहन करणार नाही.

मी मागेही सांगितले होतं की, बोलणारे बोलतात आणि ते आपल्या घरी राहतात. आपल्या गॅलरीमधून इकडे-तिकडे बघतात आणि जातात. मात्र, कार्यकर्त्यांना नोटीसा जाऊन त्यांच्यावर केसेस दाखल होतात आणि त्यांची धरपकड होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही लक्षात घ्यावे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना टोला लगावला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. (Ajit Pawar criticizes Raj Thackeray)

अजित पवारांनी राज ठाकरेंच्या मशिदींवरील भोंग्याच्या आंदोलनावर जोरदार टीका केली. राज ठाकरेंनी आजपर्यंत केलेले एकही आंदोलन यशस्वी झाले नसून त्यामुळे राज्याचे आणि समाजाचे नुकसानच झाल्याची टीका पवारांनी केली आणि राज यांनी आतापर्यंत केलेल्या त्यांच्या आंदोलनाचा पाढाच वाचून दाखवला.

पवार म्हणाले, मागे याच व्यक्तीने सांगितले होते की टोल बंद करणार पण काय झाल? एक दिवस फक्त टोल नाक्यावर जमले. पुढे काहीच झालं नाही. राज ठाकरेंची आतापर्यंत केलेली आंदोलने ही राज्याच्या आणि समाजाच्या नुकसानीची होती. टोल बंद झाली तर देशातील राष्ट्रीय महामार्गांची जी कामे झाली त्याचे काय होईल? नितिन गडकरी हे वारंवार सांगत आहेत की, टोल घेतल्यामुळेच महामार्गाचे काम झाले आहे. आता समृद्धी महामार्गाचे काम 45 हजार कोटींचे चालले आहे. पुणे-मुंबई महामार्गचे काम त्याकाळात झाले मात्र त्याच्या दुरूस्तीचे कामकाज हे टोल घेतला नसता तर झाले असते का? छोट्या रस्त्यावर टोल योग्य नाही ते आपण काढले आहे. हे त्यांचं टोलचं आंदोलन फेल गेलं आहे.

तर दुसरे आंदोलन युपी-बिहार वाल्यांनो चले जाव म्हणाले. हेही आंदोलन केल्यावर मु्ंबई, पुणे, नाशिक, औंगगाबाद येथे बांधकाम करण्यासाठी कामगार मिळत नव्हते. तेव्हा त्या लोकांना पुन्हा आणाव लागलं त्यांना त्यांची भूमिका बदलावी लागली. त्यानंतर हॅाकर्स हटवा, फेरीवाल्यांना किंवा टॅक्सीवाल्यांना दोन-चार जण मारतात मग त्यांना फुकट प्रसिद्धी मिळते. काही लोकांना करोडो रूपये खर्च करून प्रसिद्धी मिळते मात्र, काहींना न काही करताच प्रसिद्धी मिळत आहे, असा टोलाही पवारांनी ठाकरेंना लगावला.

भोंग्याच्या नियमावर बोट ठेवायचं म्हटल्यावर सगळ्यांचीच पंचाईत होईल. आवाजाच्या डेसिबलची मर्यादा मोजायची झाली तर सूर्यास्तानंतर सभा घेणे अवघड होणार आहे. म्हणजे एकप्रकारे हाताने पायावर धोंडा पाडल्यासारखे होईल. मला काळजी आहे ती ग्रामिण भागातील जागरण गोंधळ व आठ दिवस हरिनाम सप्ताह होतात त्याची. कारण सर्व कार्यक्रम हे उशिराच सुरू होत असतात. कायदा म्हटल्यावर सर्वांनाच पाळावा लागेल. यामुळे महाविकास आघाडीतील मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री आणि आम्ही याबाबत विचारपूर्वकच निर्णय घेत आहोत. आम्हाला राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवू द्यायचा नाही. मात्र, कायद्याचे उल्लंघन जर कुणी करण्याचा प्रयत्न केला तर हे सहनही केले जाणार नाही. अल्टिमेटम तर चालणारच नाही, अश्या शब्दाच पवारांनी आपले मत स्पष्ट केले.

दरम्यान, राज यांच्यावर टीका करतांना पवारांनी कार्यकर्त्यांनाही सुनावले आहे. ते म्हणाले की, बोलणारे बोलतात आणि ते आपल्या घरी राहतात आणि आपल्या गॅलरीमधून इकडे-तिकडे बघतात आणि जातात. मात्र, कार्यकर्ते आपल्या नेत्यांना काहीतरी काम केल हे दाखवण्यासाठी आंदोलनात सहभाग घेतात आणि मग त्यांना नोटीसा जाऊन त्यांच्यावर केसेस दाखल होतात आणि त्यांची धरपकड होते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यावे, हा देश, राज्य आपलं आहे. महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, असे पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT