Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Pune News: दोन उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला कात्रजकरांना 'कात्रजचा घाट'; 200 कोटींची घोषणा, आले मात्र 140 कोटीच!

Sudesh Mitkar

Pune News: पुणे शहराच्या दृष्टीने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण होणे महत्वाचे आहे. मात्र भूसंपादना अभावी हे काम रखडले आहे. त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी राज्य सरकारने अखेर 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी केली होती; पण, या घोषणेला आठ महिने होऊनही महापालिकेचे (PMC)हात रिकामेच होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी हे आश्वासन पूर्ण करण्याचा शब्द दिला आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये वर्षभराचा कालावधी गेल्यानंतर पालिकेच्या हातात १३९.८३ कोटी रुपये पडले आहेत.

कात्रज येथील राजस सोसायटी ते कोंढवा येथील खडी मशिन चौक या दरम्यानच्या रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामाला 31 ऑक्टोबर 2018 रोजी मान्यता मिळाली असून या भूसंपादन न झाल्याने रस्त्याचे काम रखडले आहे.

या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी 710 कोटी हवे आहेत. भूसंपादनामुळे दीर्घकाळ रेंगाळलेल्या या रस्त्याची रुंदी 84 ऐवजी 50 मीटर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रस्त्याची रुंदी कमी केल्याने भूसंपादनाचा खर्च 280 कोटी रुपये इतका येणार होता. यांपैकी 200 कोटी रुपये राज्य सरकारकडून मिळणार होता. आता वेळेत न मिळाल्याने हे काम ढेपाळले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कात्रज-कोंढवा रस्ताचे काही प्रमाणात टीडीआर देऊन भूसंपादन झाले आहे. त्यामुळे हा रस्ता तुकड्या तुकड्यामध्ये तयार आहे. रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपादनाअभावी रस्त्याचे काम रखडले आहे. टीडीआरचे दर कमी झाल्यामुळे जागा मालकांकडून भूसंपादनसाठी रोख रकमेची मागणी केली जात आहे. त्यामुळे या रस्त्याच्या भूसंपादनासाठी २०० कोटींच्या निधीची गरज होती.

आठ महिन्यापूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात या रस्त्यासाठी २०० कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारने मंजुरी दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सांगितले होते . पण पालिकेला हा निधी मिळालेला नाही. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील निधी देण्याचा आश्वासन दिलं होतं.

त्यानंतर मागील महिन्यात अजित पवार यांनी अचानक कात्रज कोंढवा रस्त्याला भेट दिली आणि रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याचे प्रशासनाला आदेश दिले. तसेच 200 कोटी कॅबिनेट नोट पुढच्या आठवड्यात येईल असा शब्द दिला. त्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर पालिकेला शुक्रवारी निधी मिळाला आहे. मात्र 200 कोटींचं नेत्यांनी आश्वासन दिले असताना 140 कोटी मालिकेला प्राप्त झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे काम करताना महापालिकेच्या हद्दीत भूसंपादन करताना अडचणी असल्यास त्यामध्ये राज्य सरकारकडून ५० टक्के निधी दिला जातो. सरकार महापालिकेला थेट निधी देऊ शकत नाही. त्यामुळे कात्रज कोंढवा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग ५४८ डीडी या प्रकल्पाचा भागा दाखविण्यात आला आहे. त्यातून १३९.८३ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT