मुंबई : पगारवाढीनंतरही एसटी (ST)कर्मचाऱ्याचे आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनातून भाजपचे नेते गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे बाहेर पडले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणवंत सदावर्ते हे सध्या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे.
'एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण करा,' ही त्यांची मुख्य मागणी आहे. या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे पुण्यातील आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, ''एसटीच्या या आंदोलनाबाबत तीन जणांची समिती नियुक्ती केली आहे. न्यायालयात हे प्रकरण गेले आहे. समितीच्या अहवालावरुन सरकार निर्णय घेईल. हा अहवाल येण्यापूर्वी अन्य राज्यातील सार्वजनिक वाहतुकीचा अभ्यास करुन त्याठिकाणी काय परिस्थिती आहे. त्याचा विचार करुन परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माझ्याशी चर्चा करुन पगारवाढीची घोषणा केली आहे. आता त्यांचा बऱ्यापैकी पगार वाढलेला आहे. अजूनही काही जण टोकाची भूमिका घेत आहेत,''
''कुठल्याही मागण्या करताना तुटेपर्यंत ताणायचं नसतं. टोकाची भूमिका घ्यायची नसते. 'हेच आम्हाला पाहिजे,' असे चालत नाही. मागण्या करणाऱ्यांनी आणि सरकारने पण एक पाऊल मागे-पुढे घेऊन प्रवाशांचा विचार करुन निर्णय घ्यायचा असतो. गोरगरीब जनता एसटीतून प्रवास करीत असते. विद्यार्थ्यांचा विचार करावा लागतो, काही ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींना सवलती द्याव्या लागतात,'' असे अजित पवार म्हणाले
एसटीच्या विलीनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत अजित पवार म्हणाले, ''एसटीचे विलीनीकरण करुन चालणार नाही, कारण राज्यात अन्य महामंडळही आहेत, ती महामंडळंही विलीनीकरणाची मागणी करतील, हा एका महामंडळाचा प्रश्न नाही, अंगणवाडी, आशा वर्कर, पोलिस पाटील, कोतवाल असे अनेक जण पुढे येऊन ही मागणी करतील. एसटीच्या (ST) कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही एसटीचे कर्मचारी म्हणून केलेली आहे, पुढे त्यांना सरकारचे कर्मचारी म्हणून नियुक्त करणार असे म्हटलेलं नाही. त्यामुळे हा विषय आता संपविला पाहिजे,''
एसटीच्या ३१५ बसेस रस्त्यावर सध्या धावत आहेत, सुमारे २० हजार कर्मचारी कामावर रुजू झाल्याची माहिती एसटी (ST) महामंडळाकडून देण्यात आली असली तरी आझाद मैदानावर एसटी कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. 'विलीनीकरणाशिवाय माघार घेणार नाही,' अशी भूमिका त्यांनी घेतली होती. संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा परिवहन मंत्री अनिल परब यांनी उगारण्यास सुरवात केली आहे.
पगारवाढ देऊनही एसटी कर्मचारी संप करण्यावर ठाम असतील तर पैसे न देता त्यांना संपू सुरु राहिला तर त्यात वाईट काय आहे? असा विचार राज्य सरकारला करावा लागेल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिला आहे. त्या दृष्टीने पावलेही टाकण्यास सुरुवात झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.