Ajit Pawar Statement to Police Daund Election Rally News Sarkarnama
पुणे

Ajit Pawar: अजितदादांचा पोलिसांना गर्भित इशारा; तीन पक्षांचे सरकार आहे हे लक्षात ठेवा!

Ajit Pawar Statement to Police Daund Election Rally News: दौंडमध्ये वेगवेगळ्या समाजावर दहशत निर्माण केली जात आहे. काही समाज संख्येने कमी आहे ते घाबरतात. मला पोलिस खात्याला सांगायचं आहे, दमदाटी करणारा कोणत्याही पक्षाचा असला तरी नियम लावून काम करा.

प्रफुल्ल भंडारी

दौंड: दौंडमधील प्रचारसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना गर्भित इशारा दिला. "दौंडमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे. मला पोलिस खात्याला सांगायचं आहे, हे तीन पक्षांचे सरकार आहे. तशा पध्दतीने जर कोणी त्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर निवडणूक होईल जाईल, परंतु नंतर आपण सगळे इथेच आहोत. ज्यांची कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवायची जबाबदारी आहे त्यांनी जबाबदारीचे भान ठेवून काम करावे," असा इशारा अजित पवार यांनी दिला.

"दौंड मध्ये वेगवेगळ्या समाजावर दहशत निर्माण केली जात आहे. काही समाज संख्येने कमी आहे ते घाबरतात. मला पोलिस खात्याला सांगायचं आहे, हे तीन पक्षांचे सरकार आहे. कायदा सर्वांना समान आहे. सत्ताधारी असो का विरोधक सर्वांसाठी कायदा एकच आहे. कायदा कोणीही हातात घ्यायचा नाही. त्याच्यामुळे दमदाटी करणारा कोणत्याही पक्षाचा असला तरी नियम लावून काम करा. मतदानाला दोन दिवस राहिलेले असताना कोणाचीही दमदाटी चालू देऊ नका. कुठल्याही समाजाने कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. त्या संदर्भाने आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील आपणाकडून चुका होणार नाही, याची काळजी घ्यावी," असे अजितदादा म्हणाले.

नगरपालिकेसाठी २७ पैकी २२ नवे चेहरे आणि फक्त ५ अनुभवी चेहऱ्यांना संधी दिली आहे. अनुभवी व उच्चशिक्षित उमेदवार असून त्यांना निवडून द्या. सरकारच्या निधीतील पै- पै सत्करणी लावण्यासाठी आपल्या विचाराची माणसे निवडून द्या. समाजाच्या सर्व घटकांचा विकास करताना शैक्षणिक सुविधा, रोजगाराभिमुख शिक्षण, क्रीडा सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, सुसज्ज बस स्टॅण्ड, रेल्वेचे प्रश्न, आदींसाठी आपल्या विचाराची माणसे निवडून द्या. मतदानाच्या निमित्ताने संधीचे सोनं करायचं का राख करायची ? , हे मतदारांच्या हातात आहे. निवडणुकीनंतर दौंड मध्ये पहिल्या १०० दिवसांत आणि सहा महिन्यात व पुढे टप्प्याटप्याने कोणती कामे करायचीत, याचा आराखडा तयार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

"दौंड शहराचा विकास केल्याचे भाषण करणाऱ्यांना नेमका काय विकास केला ? हा प्रश्न विचारा. दौंडचा सर्वांगीण विकास करायला निघालेल्यांना ` तू कुठे विकास केला ते दाखव? हे विचारा. विकासकामांच्या मुद्द्यावर हा सूर्य आणि हा जयद्रथ, एकदा होऊन जाऊ द्या. दौंडमधून ६५ व्यापारी स्थलांतरित झाले आहेत, हे कोणाचे अपयश आहे? मी बारामती व पिंपरी - चिंचवडमध्ये केलेली कामे दाखवू शकतो. व्यापारी बांधवांनो तुम्ही एकदा विश्वास दाखवा. नगराध्यपदासह सर्व २७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या," असे आवाहन अजित पवारांनी केले.

माजी आमदार रमेश थोरात ,दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे, माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे, वैशाली नागवडे, उद्योजक स्वप्नील शहा, गुरूमुख नारंग, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे व पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते. माजी नगरसेवक नंदकुमार पवार यांनी प्रास्ताविक केले. दिनेश पवार यांनी सूत्रसंचालन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT