Pune News : भाजप नेते व पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं नुकतंच निधन झालं. मात्र, बापट यांच्या निधनाला तीन दिवस झाले नाही तोच पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, आता वडेट्टीवारांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगलेच संतापले.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच पुणे लोकसभा पोटनिवडणूकीवरुन चर्चांवरुनही पवारांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
पवार म्हणाले, लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. गिरीश बापट यांना जाऊन आज फक्त तीन दिवस झाले आहे. इतकी काय यामध्ये घाई आहे. काही माणुसकी प्रकार आहे की नाही, काही महाराष्ट्राची परंपरा आहे की नाही असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
तसेच पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या चर्चांवरुन लोकं म्हणतील यांना थोडी तरी जनाची नाही निदान मनाची तरी आहे की नाही अशा शब्दांत राजकीय नेतेमंडळींना फटकारलं आहे.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले ?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर भाष्य केलं आहे. वडेट्टीवार म्हणाले, आम्ही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. पुण्यात बिनविरोध निवडणूक होणार नाही. पोटनिवडणुकांवेळी भाजपने कुठे आम्हाला बिनविरोध निवडून येऊ दिलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच भाजप प्रत्येक पोटनिवडणूक आमच्याविरोधात लढली आहे. त्यामुळे आम्हीही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. आणि ज्या ज्या निवडणुका येतील, त्या त्या महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे अशी रोखठोक भूमिका वडेट्टीवार यांनी जाहीर केली आहे.
राष्ट्रपती राजवटीवरील 'त्या' वक्तव्यावर अजित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते असं विधान केलं होतं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.मात्र, यावर बोलताना अजित पवार म्हणाले, मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही.
पण जयंत पाटील यांचे स्टेटमेंट मी पाहिलंय. त्यांची आणि माझी दोन एप्रिला भेट होईल. तेव्हा मी त्यांना विचारेन की बाबा, आपल्याला असा काय क्ल्यू मिळालाय, याबाबत आपल्याकडे अशी कोणती माहिती आहे की, ज्या माहितीच्या आधारे आपण असं वक्तव्य केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.