Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
पुणे

अजित पवार म्हणाले, आता माझ्याच ज्ञानात नवीन भर पडायला लागली..

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या (Municipal Elections) पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेवरुन महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता नसल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता तीन सदस्यीय प्रभाग रचना होणार असल्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. दोन सदस्यीय प्रभाग रचनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आग्रही होते. मात्र, तसे झाले नाही. याबाबत अजित पवारांना माघार घ्यावी लागली का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आपण काहीच बोललो नाही. मात्र, आता माझ्याच ज्ञानात नवीन भर पडायला लागली असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, राज्यात तीन सदस्यीय प्रभाग रचनाच असणार आहे. मी कधीही दोन सदस्यीय प्रभाग रचनेचा आग्रह धरला नव्हता आणि कुठलीही माघार घेतली नाही. जनतेच्या मनात आपण विकास करून दाखवणार आहे, असे मत रूजवू शकलो तर, प्रभाग रचना ही कितीचीही असली तरी, काही फरक पडत नाही. मागील पंधरा वर्षात १९९९ ते २०१४ आमची सत्ता होती. तेव्हा कधी तीन तर चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूका झाल्या. त्यानंतर, भाजपची सत्ता आल्यावर त्यांनी चार सदस्यीय रचनेनुसार निवडणूका घेतल्या.

प्रभाग सदस्य संख्येबाबत पक्षाच्या वेगळ्या भूमिका असू शकतात. प्रत्येक ठिकाणची रचना बघून प्रत्येकजन आपली भूमिका मांडू शकतो. मात्र, अंतिन निर्णय हा मुख्यमंत्री घेत असतात. मात्र, आता मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत तीन सदस्ययीय प्रभागाचाच निर्णय अंतिम झाला आहे.

लसीचे दोन डोस घेतलेल्यांकडून नियमाचे सर्रास उल्लंघन होत आहे..

यावेळी कोरोना संदर्भात बोलतांना पवार म्हणाले की, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, लसीचे दोन डोस घेतलेल्यांकडून नियमाचे सर्रास उल्लंघन होत आहे. प्रशासनाने केलेल्या पाहणीत याबाबतची माहिती समोर आली आहे. ज्या व्यक्तींनी एक डोस घेतला अशा व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे प्रमाण ०.१९ टक्के इतके आहे, तर दोन डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना झाल्याचे प्रमाण ०.२५ टक्के इतके आहे. ससून रुग्णालयात दाखल असलेल्या एकुण रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण हे नगर जिल्ह्यातील आहेत. उर्वरीत ६० टक्के रुग्ण हे पुणे, पिंपरी चिंचवड, ग्रामीण भागातील आसल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत..

शेतकऱ्यांना काय मदत केली जाणार आहे असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला यावर ते म्हणाले, येत्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल, हे पाहिलं जाईल, गेल्या आठवड्यात तुफान पाऊस पडल्याने मोठा भाग पूरग्रस्त बनला आहे. अनेक ठिकाणी पावसाचा मोठा फटका बसला आहे. कापूस आणि सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत विमा कंपन्यांना सूचना दिलेल्या आहेत. लवकरात लवकर शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली पाहिजे, अशा सूचना दिल्या असल्याचे पवार यांनी सांगितले.

याबरोबरच येत्या ४ तारखेपासून शाळा सुरु होणार आहेत, शाळेत कोविडच्या उपाययोजनांबाबत शिक्षणसंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तर, आठवडे बाजार टप्य्याटप्याने घेण्याबाबतही विचार सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT