Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : आम्हालाही ‘आरे’ला कारे करता येते; पण... : अजित पवारांनी विरोधकांना सुनावले

नितीन बारवकर

शिरूर : भाजपवाल्यांचे (BJP) विकासकामांपेक्षा फोडाफोडीवरच अधिक लक्ष आहे. मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेसला (Congress) बहुमत मिळाले होते. तिथे भाजपने आमदारांची फोडाफोडी करून आपला मुख्यमंत्री बसवला. कर्नाटकात कॉंग्रेसच्या मदतीने कुमारस्वामी मुख्यमंत्री होते. तेथेही फोडाफोडी केली आणि स्वतःचा मुख्यमंत्री केला. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली चांगला कारभार चालला होता. कोरोनात तर त्यांनी देशातील स्थितीच्या तुलनेत खूपच चांगले काम केले होते. त्यावेळी मी सकाळी सातपासून मंत्रालयात कामाला सुरुवात करायचो. मात्र, ते चांगले काम न देखवल्यानेच शिवसेनेत फूट पाडली. ही असली फोडाफोडी लोकशाहीला कलंक लावणारी आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपवर केली. (Ajit Pawar's serious allegations against the Bharatiya Janata Party)

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे चाळीस आमदार भाजपला जाऊन मिळाल्याने राज्यात सत्तांतर झाले. पण तिकडे जाताना प्रत्येकालाच मंत्रिपदाचे गाजर दाखवले होते. राज्यात ४३ मंत्री करता येतात. मंत्रीमंडळ विस्तारात तेवढे मंत्री केले तर बाकीचे विचारतील, आमचे काय. त्याचे उत्तर नसल्यानेच मंत्रीमंडळ विस्तार रखडवला जात आहे, असा आरोप अजितदादांनी केला.

राज्यातील सत्ताधाऱ्यांना जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ नाही. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने नाराज आमदारांची मनधरणी करायची की जनतेच्या समस्या सोडवायच्या, या चक्रव्यूहात राज्य सरकार अडकले आहे. त्यामुळे विकास ठप्प झाला असून, राज्याची अधोगती सुरू असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे केली. बंडखोर आमदारांना सांभाळण्यात आणि फोडाफोडीच्या राजकारणात गुंतल्याने सामान्यांच्या समस्यांकडे पाहायला सत्ताधाऱ्यांना वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली.

राज्यातील ३६ जिल्ह्यांना वीसच पालकमंत्री असून, काही पालकमंत्र्यांकडे सहा जिल्हे आहेत. मी एका जिल्ह्याचा पालकमंत्री असताना आणि माझे काम झटपट असतानाही मला वेळ पुरत नव्हता. एकापेक्षा अधिक जिल्ह्यांची जबाबदारी असलेले पालकमंत्री न्याय देऊ शकत नसल्याने राज्याचे नुकसान होत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनाही राज्यातील जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्यायला फुरसत नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कामगारांचे आंदोलन झाले, तर आत्ताचे काही सत्ताधारी आमदार त्यांच्यात झोपायला होते. मोठमोठ्या गर्जना करून त्यांनी वातावरण पेटवले. आता एसटीच्या कामगारांचे पगार होत नाहीत, तेव्हा त्यांचा डंका कुठे गेला, असा सवाल अजितदादांनी केला.

सत्ताधारी नेते सरड्याप्रमाणे रंग बदलत असून, आमच्या सत्तेच्या काळात सरकारच्या नावाने टाहो फोडणारे, रात्रंदिवस आंदोलने करणारे आता काही बोलायला तयार नाहीत. मूग गिळून बसलेल्यांना जनतेने जाब विचारावा, असे आवाहन पवार यांनी केले. स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून अशी यांची गत झाली आहे. त्यांची चाल न कळण्याइतके आम्ही दूधखुळे नाहीत. समाजमने विचलित करण्याचा त्यांचा कुठलाही डाव आम्ही चालू देणार नाही. केवळ यशवंतराव चव्हाण व पवार साहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत; म्हणून आम्ही शांत आहोत. आम्हालाही आरेला कारे करता येतं. त्यांना जशास तसे उत्तर आम्ही देऊ शकतो, असा इशाराही पवार यांनी दिला. आमचे सरकार गडगडले तरी आम्ही विचलित झालेलो नाही. सत्ता येत-जात असते. आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.

राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १२ हजार पोलिस शिपायाच्या भरतीसाठी १२ लाख अर्ज आलेत. त्यात पोलिस शिपाई पदासाठी इंजिनिअर झालेल्यांचे अर्ज येणे हे दुःखदायक आहे. वाढत्या बेरोजगारीचेच ते द्योतक आहे. अतिवृष्टीने नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नूकसान भरपाई मिळालेली नाही, पिकविम्याचे पैसे नाहीत. विकासकामांचा निधी रोखला जातोय. आधीच्या सरकारच्या चांगल्या निर्णयांना हरताळ फासला जातोय, असेही पवार यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT