पुणे

पुण्याच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सर्वपक्षीय आमदारांची वज्रमूठ : `सकाळ`ने घेतला पुढाकार

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 4 जुलैपासून नागपूरमध्ये होत आहे. यात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांची तड लागावी आणि नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता व्हावी, या उद्देशाने "सकाळ'ने सर्वपक्षीय आमदारांची बैठक आयोजित केली. पुण्याच्या प्रश्नांची या अधिवेशनात तड लावण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : वाहतूक, पाणी, कचरा, आरोग्य, रिंग रोड, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आदींबाबत शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात वज्रमूठ करण्याचा निर्धार सर्वपक्षीय आमदारांनी गुरुवारी "सकाळ'तर्फे आयोजित बैठकीत केला.

पक्षभेद विसरून प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य देण्याचाही निर्धार या वेळी झाला. झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी "एसआरए'च्या नियमावलीतील त्रुटी दूर करण्यात येतील. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करतानाच शेतीसाठीही पुरेसे पाणी देण्यात येईल, तसेच पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्तालय लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी या वेळी केली. 

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 4 जुलैपासून नागपूरमध्ये होत आहे. यात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍नांची तड लागावी आणि नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता व्हावी, या उद्देशाने "सकाळ'ने सर्वपक्षीय आमदारांची बैठक आयोजित केली. पालकमंत्री गिरीश बापट, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, बाबूराव पाचर्णे, सुरेश गोरे, राहुल कुल, डॉ. नीलम गोऱ्हे, जयदेव गायकवाड, अनंत गाडगीळ यांनी बैठकीत सहभाग घेतला. 

शहर-जिल्ह्यातील वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर होत असल्याचे वास्तव उपस्थितांनी मांडले. रस्त्यांचे रुंदीकरण होत नाही, तसेच आरक्षित रस्ते विकसित होत नसल्याने विकासाला मर्यादा येत आहेत, असेही त्यांनी निदर्शनास आणले. रिंग रोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पार पडली पाहिजे. तसेच, मेट्रो प्रकल्पाचा विस्तार वाघोली, हडपसर आणि निगडीपर्यंत व्हायला पाहिजे, याकडेही लक्ष वेधण्यात आले. पिण्यासाठी पाण्याचे नियोजन करताना शेतीसाठीही पुरेसे पाणी मिळाले पाहिजे. त्यात शहर व ग्रामीण भाग, असा भेदभाव होऊ नये, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.

पिंपरी-चिंवडमध्ये वाढत असलेल्या अवैध धंद्यांबाबतही या वेळी चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच, पोलिसांच्या वाढत्या संख्येच्या प्रमाणात त्यांच्यासाठी घरांची पूर्तता व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्याचे या वेळी ठरले. स्मार्ट सिटी, आर्थिक गुन्ह्यांची वाढती संख्या, ससून रुग्णालय, महिलांसाठी स्वच्छतागृहे, पार्किंग, विकास आराखड्यातील आरक्षणांचे संपादन, भीमा नदीचे प्रदूषण, नगर रस्त्यावरील कोंडी आदींबाबतही या बैठकीत चर्चा झाली. 

संपादक सम्राट फडणीस यांनी स्वागत केले. कार्यकारी संपादक शीतल पवार यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला; तर सहयोगी संपादक रमेश डोईफोडे यांनी प्रास्ताविक केले. मुख्य वार्ताहर संभाजी पाटील यांनी आभार मानले. 
-------------- 
या प्रश्नांची अधिवेशनात होणार चर्चा 
-------------------------------------- 

  • पुणे 
  • - "एसआरए'ची नियमावली, त्यातील त्रुटी 
  • - रिंग रोडसाठी भूसंपादन 
  • - मेट्रोचे वाघोली, निगडी, हडपसर विस्तारीकरण 
  • - बीडीपीचा मोबदला, बांधकामाचे धोरण 
  • - पोलिसांच्या घरांची अपुरी संख्या 
  • --------------------------- 
  • पिंपरी-चिंचवड 
  • - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यान्वित करणे 
  • - पिंपरी-चिंवडमधील वाढती गुन्हेगारी 
  • - पवना जलवाहिनीची परवानगी 
  • - एमआयडीच्या काही जागेवर एसआरए 
  • - प्राधिकरणाच्या जागेसाठी शेतकऱ्यांचा मोबदला 
  • -------- 
  • जिल्हा 
  • - प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, मोबदला 
  • - शेतीसाठी पुरेसे पाणी 
  • - जिल्ह्यातील वाहतूक कोंडी 
  • - मुळा-मुठा, इंद्रायणी नदीतील प्रदूषणामुळे पाणीसाठे प्रदूषित 
  • - एमआयडीसीमधील वाढती गुन्हेगारी 
     

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT