Amit Shah
Amit Shah Sarkarnama
पुणे

आता खरी चुरस : भाजपचे चाणक्य अमित शहाच येणार पुणे पालिकेत

ब्रिजमोहन पाटील

पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक ही भाजपसाठी आव्हानाची तर राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार हेच पुण्यासाठीच रणनीती ठरवत असतात. आता भाजपनेही निवडणुकीच्या सहा महिने आधी प्रचाराचे रणशिंग फुंकण्याचे ठरविले असून त्यासाठी खुद्द केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शहा यांना पुणे महापालिकेत निमंत्रित केले आहे. शहा हे २६ नोव्हेंबर रोजी दुपारी पालिकेत कार्यक्रमास येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

शहा हे पुण्याच्या दौऱ्यावर असून त्यानिमित्ताने ते शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. या निमित्ताने भाजपनेही प्रचाराचा मूहूर्त शोधला आहे.

पुणे महापालिका भवनातील हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तयार केले जाणार असून, त्याचे भूमिपूजन आणि महापालिकेच्या नव्या इमारतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते होणार आहे.

भाजपच्या आज झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना भाजपचे सरकार येईल, पण ते कधी येईल याची वाट न पाहता आगामी महापालिका निवडणुकांत महाविकास आघाडीला आव्हान देण्यासाठी सज्ज राहण्याचे आव्हान केले होते. त्याचे पडसाद पुण्यात दिसून आले.

महापालिकेची निवडणूक पुढच्या काही महिन्यांवर आली, त्यापूर्वी शहरातील जायका, नदी सुधारणा प्रकल्प यासह इतर महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पिंपरी-चिंचवड, पुण्यातील मेट्रोचे उद्घाटन महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी करण्याची धडपड भाजपची सुरू आहे. त्यासाठी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना पुण्यात आणण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. याची वाट न पाहता अमित शहा हे पुण्यात येत असताना त्यांना महापालिकेत आणून निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच फोडण्याची तयारी भाजपने सुरू केली.

२६ नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास अमित शहा, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व इतर नेते कार्यक्रमासाठी येणार आहेत. तसेच गणेश कला क्रीडा मंच येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. यासंदर्भातील तयारी करण्यासाठी आज (मंगळवारी) सायंकाळी महापौर बंगल्यावर तयारीची बैठक झाली, त्यास महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते गणेश बीडकर यांनी दुजोरा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT