Pune News: चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातील पत्रावर स्वाक्षरी करणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास टिंगरे यांना चांगलेच महागात पडले आहे. अमोल बालवडकर यांच्यानंतर आता टिंगरे यांच्या प्रभागातील तब्बल १२ कोटी रुपयांचा निधी भाजपने अन्य प्रभागात वळवला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव ११ विरुद्ध ३ मतांनी मंजूर करण्यात आला असून, या निर्णयामुळे पुणे महापालिकेतील भाजप-राष्ट्रवादी संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिलेल्या पत्राला अनुमोदक म्हणून नगरसेवक सुहास टिंगरे यांनी स्वाक्षरी केल्याने त्यांच्यावरही भाजपने राग काढला आहे.
गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत टिंगरे यांच्या ‘स’ यादीतील १२ कोटी रुपयांचा निधी भाजप नगरसेवकांच्या प्रभागात वळविण्यात आला आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीतील संघर्ष आणखी पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोथरूड विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून बालवडकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यात राजकीय वैर निर्माण झाले आहे. त्यातचूनच बालवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून झालेल्या विकास कामांची चौकशी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत दिला होता. भाजपने हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला आणि महापालिकेच्या अर्थसंकल्पात बालवडकर यांना ‘स’ यादीतून दिलेला १२ कोटी रुपयांचा निधी काढून घेतला. त्यावरून महापालिकेच्या सभागृहात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.
बालवडकर यांच्या पत्रावर सुहास टिंगरे यांची स्वाक्षरी होती, त्यामुळे भाजपने त्यांच्याकडे मोर्चा वळवला. आज स्थायीच्या बैठकीत टिंगरे यांच्या प्रभाग क्रमांक २ 'ड' मधील सुमारे ८० कामांसाठी तरतूद केलेली १२ कोटी रुपयांची रक्कम प्रभाग क्रमांक ३ मध्ये वर्ग करण्यात आली. त्यास राष्ट्रवादीने विरोध केला असता ११ विरुद्ध ३ अशा मतांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना पत्रकार परिषदेत या विषयासंदर्भात माहिती विचारली असता, त्यांनी असा काही विषय झाल्याची माहिती नाही, आज खूप विषय होते, असे सांगितले. पण पत्रकारांनी मुद्दा लावून धरल्यानंतर त्यांनी प्रभाग क्रमांक २ ड चा निधी प्रभाग क्रमांक ३ मध्ये वर्गीकरण केला असे सांगितले. पण त्यावर त्यांनी भाष्य केले नाही.
टिंगरे यांनी पत्रकारांपुढे भूमिका मांडली. मी चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भातील पत्रावर स्वाक्षरी केली म्हणून माझा निधी काढून घेऊन नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही. लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक हे परस्परांना पूरक घटक असतात, एकमेकांचे शत्रू नसतात. माझा निधी काढून घेतल्याने याविरोधात मी लढा देईन. पण त्यांच्या भाजपकडे जाऊन भीक मागणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.