पुणे : अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांत घेतलेल्या निर्णयाचा विचार आणि कदाचित फेरविचार करण्याचा मनसुभाही त्यांनी बोलून दाखवला आहे. फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी आपल्या या निर्णयाची माहिती दिली आहे, त्यामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीबद्दल गूढ वाढले आहे. (Amol Kolhe says it is time to reconsider the decision taken in the last few years)
डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही सिंहावलोकनाची वेळ आहे. गेल्या काही दिवसांत, महिन्यांत आणि वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो. काही टोकाचे निर्णय घेतले. काही अनपेक्षित पावलं उचलली गेली. पण, हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय. तो थोडा शारीरिक, बराचसा मानसिक आहे. शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल; पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं, थोडं मनन आणि थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचारसुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय... काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू...नव्या जोमाने, नव्या जोशाने!! या फेसबुक पोस्टवर त्यांनी टीपही लिहिली असून फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही, असेही म्हटलेले आहे.
लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर अमोल कोल्हे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या निवडणुकीत त्यांनी शिरूरमधून तीन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवस्वराज्य यात्रा काढली होती. त्या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी राज्यात राष्ट्रवादीचा झंझावात तयार केला होता.
कोल्हे यांच्या आक्रमक भाषणाचा राष्ट्रवादीला विधानसभेला फायदा झाला होता. पण, कोविडच्या काळात मतदारसंघात फिरकत नसल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात होती. विशेषतः त्यांच्या शुटींगवरून त्यांच्यावर तोंडसुख घेतले जात होते. कदाचित राजकारण आणि अभिनय या क्षेत्राला वेळ देताना त्यांची ओढाताण होत असावी, असे त्यांच्या फेसबुक पोस्टवरून दिसते. त्यामुळेच त्यांनी चिंतन आणि सिंहावलोकनाची भाषा केली असावी, असे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.