Deputy Collector Raghunath Tadge
Deputy Collector Raghunath Tadge Sarkarnama
पुणे

शिपाईपदावर भरती झालेला कर्मचारी निवृत्तीच्या दिवशी झाला उपजिल्हाधिकारी

रमेश वत्रे : सरकारनामा

केडगाव (पुणे ) : महसूल विभागात शिपाई म्हणून भरती झालेल्या मुलाकडून कुटुंबाने, समाजाने काय अपेक्षा ठेवाव्यात. भरती झाला तेव्हा कोणाचे लक्षही नसेल परंतू निवृत्त झाला तेव्हा सर्वांनाच सुखद धक्का देऊन गेला. काहींनी तर तोंडात बोटे घातली. बोरीपार्धी ( ता.दौंड ) येथील शिपाई मुलगा 'उपजिल्हाधिकारी रघुनाथ ताडगे' ( Deputy Collector Raghunath Tadge) म्हणून निवृत्त झाला.

महसूल विभागात ४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ताडगे यांना हे पद मिळाले. गमतीचा भाग म्हणजे त्यांना हे पद एक दिवसासाठी मिळाले. मोठ्या प्रतिक्षेनंतर राज्य सरकारने ३० मे रोजी त्यांच्या बढतीचा आदेश काढला, ३१ मे रोजी पदभार स्वीकारला आणि त्याच दिवशी ते निवृत्त झाले. ताडगे खुल्या वर्गातील असल्याने आरक्षणाच्या शिडीशिवाय त्यांनी जिद्द व प्रामाणिकपणाच्या गुणवत्तेवर हे यश मिळविले आहे.

१९८३ साली त्यांचे वडील आबासाहेब ताडगे यांचे ह्रदय विकाराने निधन झाले. ते महसूल विभागात शिपाई म्हणून होते. त्यांच्या निधनानंतर दहावीपर्यंत शिकलेले रघुनाथ वयाच्या १९ व्या वर्षी अनुकंपा तत्वावर नोकरीला लागले. शिपाई ( १९८३ ), गोदाम पालक ( १९९९ ) अव्वल कारकून ( २००५ ), नायब तहसीलदार (२०१० ), तहसीलदार ( २०१७ ), उपजिल्हाधिकारी ( २०२२ ) असा सेवेतील चढता क्रम राहिला.

गेल्या ४० वर्षात प्रशासनात जसे बदल होत गेले तसे त्यांनी आत्मसात केले. २०१८ साली अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ताडगे यांना उत्कृष्ठ सेवेबद्दल गौरविण्यात आले होते. जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांच्या उपस्थितीत त्यांना निरोप देण्यात आला. आठ जूनला मराठा महासंघाच्यावतीने बोरमलनाथ देवस्थान चौफुला येथे चार वाजता त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. ''निष्कलंकपणे सेवा केली त्याचे फळ मिळत गेले. याचेच समाधान आहे.'' असे मत रघुनाथ ताडगे यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT