Devendra Fadnavis, Russia Latest News Sarkarnama
पुणे

अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्याचे रशियात अनावरण; या ऐतिहासिक क्षणी फडणवीस म्हणाले,...

उत्तम कुटे

पिंपरी : रशियाची राजधानी मॉस्को येथे Maragarita Rodomino All Russia State Library for Foreign Literature या जगप्रसिद्ध ग्रंथालयाने आपल्या प्रांगणात उभारलेल्या साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज झाले. महाराष्ट्राचे मॅक्झिम गॉर्की असलेल्या अण्णाभाऊंच्या पुतळ्याचे रशियात (Russia) अनावरण हा ऐतिहासिक क्षण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Devendra Fadnavis, Russia Latest News)

फडणवीस आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर हे या पुतळा अनावरणासाठी खास मॉस्कोत काल गेले आहेत. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, पुण्यातील भाजपचे आमदार सुनील कांबळे, उद्योजक पद्मश्री मिलिंद कांबळे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व पिंपरी-चिंचवडकर अमित गोरखे, परराष्ट्र सेवेतील अधिकारी सुनील वारे, मुंबई विद्यापीठाचे डॉ., संजय देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.

हा पुतळा उभारल्याबद्दल मार्गारिटा. संस्थेचे अभिनंदन करून त्यांचे आभार व्यक्त करणारा ठराव राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गेल्या महिन्यात एकमताने संमत करण्यात आला होता. त्याची प्रत नार्वेकर यांनी संस्थेच्या संचालकांना यावेळी दिली. रशियामध्ये अण्णाभाऊंचा अर्धाकृती पुतळा बसविणे ही बाब महाराष्ट्रासह देशाचा मान व शान वाढणारी आहे, असे या ठरावात म्हटले आहे. मुंबई विद्यापीठानेही या पुतळा उभारणीसाठी पुढाकार घेतलेला आहे.

दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने या सोहळ्य़ाची सुरूवात झाली. वंचितांचा आवाज असलेल्या क्रांतीकारी साहित्यिक अण्णाभाऊंचा पुतळा उभारल्याबद्दल फडणवीसांनी मार्गारिटा लायब्ररीला धन्यवाद दिले. त्यांचे आभार मानले. अण्णाभाऊ हे भारत आणि रशियातील सबंधांचा एक पूल आहे. त्यांच्यामुळे हे दोन्ही देश आणखी जवळ आले, असे त्यांनी सांगितले. ते व्यक्ती नाही, तर एक संस्था व विद्यापीठ होते, असे ते म्हणाले. देशाचा स्वातंत्र्यलढा, गोवा मुक्तीसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान असलेल्या व सामाजिक परिस्थितीमुळे फक्त एकच दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी सामाजिक आशयावर ३७ पुस्तके, १९ कथा, ११ पोवाडे, १४ लोकनाट्ये, तीन नाटके, शंभर गाणी असे विपूल लेखन केले, असे त्यांनी सांगितले. जयहिंद, जय महाराष्ट्र, जय भारत आणि जय रशिया असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणांची सांगता केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT