Pune Bjp News Sarkarnama
पुणे

Pune Bjp News : "भ्रष्टाचार्‍यांचा एकच नारा, जेलपेक्षा भाजप बरा; हेच का पार्टी विथ डिफरंट?"

Chaitanya Machale

Pune News : निवडणुकांना सामोरे जाताना दहा वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाने (भाजप) मतदारांना अनेक आश्वासने दिली होती. भाजप सत्तेवर असतानाही गेली अनेक वर्षे काँग्रेस सरकारने काहीही केलेले नाही, यांनी प्रत्येक गोष्टीत केवळ भ्रष्टाचार केला असल्याची, उदाहरणे देत भाजपचे नेते काँग्रेसवर तुटून पडले होते.

तेरा ते चौदा वर्षांपूर्वी 2010 मध्ये याच भाजपने त्यावेळचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना 'आदर्श' सोसायटी घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावला होता. कोळसा घोटाळा, टू जी स्पेक्ट्रम घोटाळा, असे आरोप करत भाजप 'भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न’ दाखवत सत्तेत आली. त्यावेळी आम्ही 'पार्टी विथ डिफरंट ' असल्याचे सांगत भाजपच्या नेत्यांनी मोठा गाजावाजा देखील केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत, प्रसंगी पुरावे देत भाजपने नेहमीच या नेत्यांवर कडाडून टीका केली होती. मात्र आज या भाजपने सिंचन घोटाळा प्रकरणात नाव आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील छगन भुजबळ तसेच आता आदर्श घोटाळ्यातील अशोक चव्हाण यांना आपल्या भाजपमध्ये प्रवेश देत त्यांना आपल्यामध्ये सामील करून घेतले आहे.

"केंद्रासह राज्यात भाजपची सत्ता असल्याने आपल्याकडे असलेल्या विविध यंत्रणांचा वापर करून चुकीचे काम केलेल्या राजकीय मंडळींची चौकशी लावण्यास भाजपने सुरुवात केली आहे. ज्या राजकीय मंडळींवर भाजपने एकेकाळी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच आपल्या सत्तेत स्थान देत त्यांच्यावर आपली 'कृपादृष्टी' दाखविण्याचे काम सध्या भाजपने सुरू केलेले आहे. भाजप मध्ये सहभागी झाल्यानंतर सुरू असलेल्या सर्व चौकशा, जुन्या फाईल्स बंद होत असल्याने या सर्व 'भ्रष्टाचार्‍यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा बक्षिसी देणारा भाजप (BJP) बरा," अशी टीका आम आदमी पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली.

ज्या नेत्यांवर भाजपने हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच आता भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. इतकंच नव्हे तर अशा नेत्यांना उमेदवारी देखील देण्यास भाजपकडून प्राधान्य दिले जात आहे. नेत्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्याचे आरोप असतील तर त्यांना भाजपमध्ये देऊन येथे करावा, असे सांगण्याचा तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा हट्ट नाही ना? असा प्रश्न किर्दत यांनी विचारला आहे.

हीच भाजपची संस्कृती का ?

आता भाजप नेते ‘आदर्श घोटाळा प्रकरण न्यायप्रविष्ट आहे,अजून आरोप सिद्ध झालेले नाहीत, असे म्हणत आहेत. मग आरोप सिद्ध नसताना भाजपाने अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडले, सिंचन घोटाळा संदर्भातही अजितदादांना मंत्रीपदावरून हटवण्यात आले होते. त्यामुळे आता भाजपाचे खरे रूप उघड होते आहे. भाजप हा सत्तेसाठी काहीही करणारा पक्ष झाला आहे असा टोला देखील किर्दत यांनी लगावला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT