Former Sarpanch Sanjay Pokharkar
Former Sarpanch Sanjay Pokharkar Sarkarnama
पुणे

माजी सरपंचावर कोयत्याने वार; हल्लेखोरास गावकऱ्यांनी पकडले

सुदाम बिडकर

पारगाव (जि. पुणे) : आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील वडगाव पीर गावच्या यात्रेतील तमाशाच्या कार्यक्रमात विंधनविहिरीच्या पाणी वाटपाचा राग मनात धरून येथील माजी सरपंच संजय दिगंबर पोखरकर यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पोखरकर गंभीर जखमी झाले आहेत. पोखरकर यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे सावळेराम आदक यांच्या हातावरही वार झाले आहेत. या दोघांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुण्यात हलविण्यात आले आहे. दरम्यान, हल्ला करणारा संतोष कचरू राजगुडे (रा. वडगाव पीर) यास ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (Armed attack on former sarpanch in Ambegaon taluka)

वडगाव पीर येथील पीरसाहेबाच्या उत्सावाला शुक्रवारपासून (ता. २६) सुरुवात झाली. संदलचा कार्यक्रम शुक्रवारी झाला, त्यानंतर शनिवारी बैलगाडा शर्यती झाल्या. माजी सरपंच संजय दिगंबर पोखरकर यांच्या पत्नी मीरा पोखरकर या विद्यमान सरपंच आहेत. पोखरकर हे गेली आठवडाभरापासून यात्रेच्या नियोजनात व्यस्त आहेत. यात्रेनिमित्त शनिवारी (ता. २६ मार्च) रात्री गावात तमाशाचा कार्यक्रम ठेवला होता.

स्टेजवरील मान्यवरांचा मानसन्मान उरकून संजय पोखरकर, सावळेराम फकिरा आदक, देवराम पंढरीनाथ आदक हे तिघे जण स्टेजवरून खाली उतरत ५० फुट अंतरावर गेले होते. त्यावेळी संतोष कचरू राजगुडे याने बुधवारी (ता. 23 मार्च) झालेल्या भांडणाच्या व सामाईक विंधनविहिरीच्या पाणीवाटपाचा राग मनात धरून माजी सरपंच संजय पोखरकर यांच्या डोक्यावर पाठीमागून कोयत्याने वार केला.

पोखरकर यांनी मागे वळून पाहिले असता संतोष राजगुडे याने दुसरा वार कपाळावर केला. पोखरकर यांच्यासोबत असलेले सावळेराम फकिरा आदक यांनी आपला डावा हात मध्ये घातल्याने तिसरा वार त्यांच्या डाव्या हातावर लागला. चौथा वार उजवा हात मध्ये घातला असता पोखरकर यांच्या मनगटावर लागून जखमी झाले. तोपर्यंत जमलेल्या लोकांनी संतोष कचरू राजगुडे यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

निरगुडसरचे माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील यांनी तातडीने सूत्र हलवून पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर संजय पोखरकर व सावळेराम आदक यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुण्यातील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले. मंचरचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT