Praveen Darekar
Praveen Darekar Sarkarnama
पुणे

दरेकर म्हणतात तसे महसूलच्या बदल्याबाबत खरंच कोटींचा व्यवहार होतो ?

उमेश घोंगडे

पुणे : महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen darekar) यांनी आज नाशिक येथे बोलताना केला. महसूलच्या बदल्यांमध्ये एक ते दीड कोटी पासून पाच-पाच कोटी रुपयांपर्यंत आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

राज्य सरकार केवळ भ्रष्टाचारात बरबटलेलं असून जनहिताचे कोणतेही काम या सरकारकडून होत नसल्याचा आरोपही दरेकर यांनी केलाय. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधला भ्रष्टाचार हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात तसा नवा नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि शंभर कोटींची वसुली यावरून महाराष्ट्रात गेल्या एक वर्षभरापासून आरोप-प्रत्यारोप आणि राजकारण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी केलेला आरोप महत्त्व पूर्ण आहे.

आजच घडलेल्या घडामोडी नुसार शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात आरोपी सचिन वाझे याचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज न्यायालयाने मान्य केला असून माजी गृहमंत्री आणि अनिल देशमुख हे या प्रकरणातील मुख्य आरोपी ठरले आहेत. या प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार होऊन नेमकी काय माहिती समोर आणतो हे उत्सुकतेचं ठरणार आहे. या प्रकरणात पुढे काय होईल ते येत्या काळात समोर येईलच.

महाराष्ट्राच्या महसूल विभागात वर्षानुवर्ष बदल्या आणि बदल्यांसाठी होणारा आर्थिक व्यवहार हा मोठा चर्चेचा विषय आहे. दरेकर यांनी केलेल्या आरोपांमुळे आर्थिक व्यवहारांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. दरेकर यांच्या म्हणण्याप्रमाणे ग्रामीण भागातील आधिकाऱ्यांच्या बदलीसाठी किमान एक ते दीड कोटी रुपयांचा व्यवहार होतो. शहरी भागातील बदल्यांसाठी हा दर आणखी मोठा आहे. पाच-पाच कोटी रूपयांपर्यंत हा आकडा असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

दरेकर यांच्या आरोपामुळे गेल्या काही वर्षातील या बदल्यांचे आकडे वाढत असलेले दिसत आहे. सरकार कोणतेही असो दरवेळी हे आकडे वाढलेले कानावर येतात. प्रामुख्याने महसूलसह, उत्पादन शुल्क, भूमी अमिलेख, पोलीस, वैधमापन आणि कृषी विभागातील महत्वाच्या जागांवरील बदल्यांसाठी हे आकडे वाढत असल्याची चर्चा नेहमी होत असतात. दबक्या आवाजात हे आकडे त्या-त्यावेळी कानावर पडत असतात. दरकेर यांनी त्याची पुन्हा आठवण करून दिली इतकेच.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT