Pune News : माऊलींच्या भेटीची आस लागलेल्या लाखो वारकऱ्यांनी गुरुवारी पंढरपुरकडे प्रस्थान केले आहे. हे वारकरी गुरुवारी रात्रीपासून पुण्यात मुक्कामी आहेत. पण या मुक्कामात राहण्यापासून ते पाण्यामुळे वारकऱ्यांचे अतोनात हाल सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून पुणे महापालिकेने नेमकी काय आणि कशी तयारी केली असा सवाल उपस्थित होत आहे.
वारकऱ्यांच्या सोईसुविधेसाठी पुणे महापालिकेने बरीच तयारी केल्याचे सांगितले गेले. पावसाने ओढ दिल्याने महापलिकेने शहरात पाणी कपात सुरु केली होती. पण आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पुण्यात येणार असल्याने शहरातील पाणी कपात मागे घेण्यात आली. पुण्यात मुक्कामी आलेल्या वारकऱ्यांना पाणी कमी पडू देणार नाही अशी वाल्गना पुणे महापालिकेने केली होती.
त्यामुळे वारकऱ्यांना पाणी मिळाले अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात आज सकाळपासून, नाना पेठ, भवानी पेठ, गुरूवार पेठ आदी भागातील वारकऱ्यांना पाणी टंचाईला समोरे जावे लागले. जलवाहिनी हवा अडकून राहिल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला असल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे सकाळी वारकरी अंघोळ, कपडे धुवणे आदी कारणासाठी गेले असता त्यांना शाळा, मंगलकार्यालये, महापालिकेने तयार केलेले पानवठे येथे पाणीच नसल्याचे समोर आले.
काही ठिकाणी पाणी असले तरी त्याला दाब नसल्याने अतिशय लहान धार होती. त्यामुळे वारकऱ्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना फोन करून पाणी नसल्याची तक्रार केली. त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण काही अधिकाऱ्यांनी सकाळी सकाळी फोन उचलले नाहीत. काही वेळांनी अधिकाऱ्यांनी फोन उचलून पाणी पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला. पण कार्यकर्त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केल्यानंतर पाणी पुरवठा विस्कळीत का झाला याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
ऋषिकेश बालगुडे म्हणाले, ‘‘सकाळपासून गुरुवार पेठ व परिसरातील भागांमध्ये पाणी नाही. जेथे पाणी येत आहे. तेथे दाब खूप कमी आहे. शहरात वारकरी मुक्कामी असताना पाणी पुरवठा विभागाचे नियजोन बिघडले आहे. त्याचा त्रास वारकऱ्यांना झाला.’’
चेतन अगरवाल म्हणाले,‘‘सकाळी साडेआठपासून पाणी नसल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेकदा फोन केले, पण माझेच फोन अधिकाऱ्यांनी घेले नाहीत. पाणी पुरवठ्याचे नियोजन बिघडले आहे,"
दुसऱ्या बाजूला वारकऱ्यांना राहण्यासाठी व्यवस्था व्हावी, विद्यार्थ्यांचीही गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेने तब्बल 101 शाळांना सुट्टी जाहीर केली होती. पण महर्षी अण्णासाहेब शिंदे शाळा घोरपडे पेठ येथे मुक्कामासाठी आलेल्या वारकरी बांधवांचं साहित्य बाहेर फेकून देण्यात आले. वारकरी भोजनासाठी बाहेर गेल्यावर येथील संतोष गवळी व एक महिला यांनी वारकरी बांधवांचे सामान व वस्तू बाहेर फेकले व येथे झोपायचं नाही दुसरीकडे झोपा, उद्धटपणे या वारकऱ्यांची वागले असे सांगण्यात आले.
हा प्रकार घडल्यानंतर वारकरी बांधवांनी काही कार्यकर्त्यांना संपर्क साधला हा प्रकार घडला असल्याचे सांगितले. हे कार्यकर्ते तिथे पोहोचले असता संबंधित व्यक्ती कुलूप लावून निघून गेली होती. येथील वारकरी बाहेर वरंड्यातील जागेत आराम करत होते. त्यांच्याकडून सर्व गोष्टी समजून घेऊन महापालिका शिक्षणप्रमुख बारवे व वाखारे यांना संपर्क केला असता त्यांनी फोन उचलले नाहीत.
त्यानंतर शाळेच्या प्राध्यापक पोटे यांना संपर्क केला. त्यांनी सदर खोलीला कुलूप लावायचे याबाबत सांगण्यात आले, त्यात शाळेचे सामान आहे असे सांगितले. परंतु वारकरी बांधवांचे येथे सामान असताना हेच सामान बाहेर का ठेवले? त्यांना वऱ्हांड्यात झोपायला का लावले? याबाबत ते काही बोलू शकले नाहीत. या खोलीबाबत पूर्वकल्पना वरिष्ठांना तुम्ही दिली होती का याबाबत पण त्या निरुत्तर होत्या.
पुणे महानगरपालिका व सत्ताधारी वारकऱ्यांची सेवा वारी नाही ती हालकरी सेवा झाली आहे. वारकरी बांधवांसाठी या ठिकाणी काल सुद्धा स्वच्छता गृह उपलब्ध नव्हते. स्वच्छतागृहाला महिलांच्या या ठिकाणी राहत असणाऱ्या त्या गवळीने कुलूप लावलेले होते. आत्तासुद्धा कुलूप आहे. याबाबत नक्कीच येत्या सोमवारी जाब विचारणार असल्याचे ऋषिकेश बालगुडे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.