Ashish Bharati Sarkarnama
पुणे

PMC Covid Scam : अटकपूर्व जामिनासाठी तत्कालीन आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारतींच्या जोरदार हालचाली

Pune Crime News : महापालिकेतील तिघा डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने अटक होण्याची शक्यता

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : पुणे महापालिकेने कोविड काळात केलेल्या उपचार साहित्याची खरेदी महापालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतींच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर डॉ. भारतींसह महापालिकेतील तिघा डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांना अटक होणार आहे. त्यातही या तिघांविरोधात फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी डॉ. भारतींनी हालचाली सुरू केल्या असून, पुढील दोन दिवस न्यायालयाला सुटी असल्याने काही तासांतच त्यांना जामीन मिळवावा लागणार आहे. अन्यथा थेट तुरुंगात जावे लागण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेतून बदली होताच डॉ. भारती हे राज्य सरकारच्या सेवेत रुजू झाले असून, ते सध्या मुंबई आरोग्य खात्याच्या मुख्यालयात आहेत.

कोविडच्या उपचार साहित्यात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवून, पुणे महापालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतींसह तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांच्या तपासानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने पुणे महापालिकेतील आरोग्य खात्यासह सर्वच वरिष्ठांचे धाबे दणाणले आहेत. यानिमित्ताने पुणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेंचेच ‘पोस्टमार्टेम’ होण्याची चर्चा आहे.

मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमधील घोटाळ्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांना ताब्यात घेतले. त्याचवेळी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनाही ‘ईडी’च्या चौकशीला तोंड द्यावे लागत आहे. त्याशिवाय काही वरिष्ठ अधिकारीही आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत.

मुंबईतील कोविड घोटाळ्याच्या चौकशांचा फेरा वाढत असतानाच पुणे महापालिकेतील एका घोटाळ्याने महापालिका प्रशासन हादरले आहे. कोविडची साथ संपूनही दोन वर्षे होत आली; तरीही या काळातील व्यवहारांच्या चौकशी सुरूच आहेत. त्यामुळे आता तपासात आणखी कोणाकोणाची नावे पुढे येणार हे पाहावे लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरोग्याधिकाऱ्याने दिली फिर्याद

महापालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, आरोग्य अधिकारी डॉ. अरुणा सूर्यकांत तरडे, डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी यांच्या विरोधात वारजे माळवाडी पोलिस ठाण्यामध्ये कोविड काळात ८० ते ९० लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०२१ मध्ये कोविड काळात कै. अरविंद बारटक्के रुग्णालय वारजे या ठिकाणी घडला आहे. या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात महापालिकेचे माजी आरोग्य अधिकारी सतीश बाबूराव कोळुसरे यांनी फिर्याद दिली आहे.

असे आहे घोटाळ्याचे स्वरूप

पोलिसांनी दिलेलेल्या माहितीनुसार, डॉ. तरडे, डॉ. गार्डी आणि डॉ. भारती यांनी संगनमत करून शासनाकडून नागरिकांसाठी आलेल्या टेस्टिंग किट वापरल्याचे भासवून ते खासगी लॅब आणि व्यक्तींना विकले. त्यामधून जवळपास ८० ते ९० लाख रुपयांची अफरातफर झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यासाठी सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करून खोटी कागदपत्रे खरी असल्याचे भासवण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जैतापूरकर करीत आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT